१०४ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
मंडळीला जो जय मिळाला, सोवळ्या हिंदू लोकांनीं नमतें घेऊन तडजोडीच्या बोलण्यास सुरवात करून बहिष्कृत वर्गातल्या लोकांवर आजपर्यंत चालत आलेल्या अन्यायाची जी अप्रत्यक्ष कबुली दिली, त्यामुळे सर्व बहिष्कृत वर्गीयांना साभिमान समाधान वाटणें स्वाभाविक आहे. बारा महार मुसलमान झाल्यावर दोन सार्वजनिक विहिरी पूर्वास्पृश्यांच्या उपयोगासाठी खुल्या करून देण्यांत आल्या आणि तीन वरिष्ठवर्णीय हिंदू लोकांच्या घरांत स्पर्शास्पर्श न पाळतां पूर्वास्पृश्यांच्या पुढाऱ्यांना पानसुपारीला बोलावून त्यांचा सन्मान करण्यात आलां ; ह्याच गोष्टी जर अगोदरच आपखुषीने, धमकी देण्याचा व तिची अंमलबजावणी करण्याचां प्रसंग न आणता, करण्यात आल्या असत्या तर वरिष्ठ जातीय म्हणविणाऱ्या
हिंदूंच्या
मनाचा मोठेपणा व बुद्धीचा समंजसपणा
दिसून आला असता, कदाचित जळगांवच्या वरीष्ठ वर्णीय म्हणविणाऱ्या लोकांमध्यें थोडे खरोखच मनाचे थोर, समतावादी, न्यायप्रिय लोक असतील, परंतु त्यांच्या मताला इतर सोवळ्या लोकांनी मान देण्याची तयारी बहिष्कृतांची धमकी अंमलांत येईपर्यंत दाखविलीं नाहीं ही गोष्ट निर्विवाद खरी आहे. हिंदुसमाजाचा हा मोठा अधःपात आहे असें आम्ही समजतों. हा लवचिकपणा आहे व याच्यामुळेच आतापर्यंत हिंदुसमाज टिकला व यापुढें टिकेल असें जे कोणी म्हणणार असतील ते म्हणोत परंतु आम्ही तरी हा त्यांचा अधःपातच समजतों. जळगांवच्या सोवळ्या लोकांनीं केलेली तडजोड म्हणजे जबरीचा रामराम होय. मुसलमानी व खिस्ती हे धर्म हिंदुस्थानांत नसतें, हिंदुसमाजापुढें आपल्या संख्याबलाचा प्रश्न नसता, तर अस्पृश्यांची काय स्थिती झाली असती, त्यांना आपल्यावरील अस्पृश्यता घालविणे किती कठीण झालें असतें, स्वत:च्या उन्नतीप्रीत्यर्थ प्रयत्न केल्याबद्दल त्यांना आणखी किती अनन्वित छळ सोसावा लागला असता, हा विचार अशा प्रसंगी मनात आल्याखेरीज राहात नाहीं. हिंदुसमाजाची स्पर्शास्पर्शविषयक समजुतीवर जर खरोखरच श्रद्धा असती तर बाराच्याऐवजीं बाराशें, बारा हजार किवा बारा लाख अस्पृश्य मुसलमान झाले असते म्हणून त्यानें कधींही नमतें घेतलें नसतें. आणि जर त्याला खरोखरच न्यायाची, समतेची व माणुसकीची चाड असती तर त्यानें अस्पृश्यांवरील सामाजिक अन्याय दूर करण्याकरिता, धर्मांतराची धमकी मिळेपर्यंत व ती अंशतः अंमलांत येईपर्यंत कधीही वाट पाहिली नसती. जोपर्यंत बहिष्कृतांना चिरडतां येईल तोंपर्यंत चिरडावें, जोपर्यंत त्यांच्यावरील अन्याय खपून जात असेल तोंपर्यंत तो खपू द्यावा, जोपर्यंत जोराचा प्रतिकार होत नसेल तोपर्यंत खुशाल जुलूम करावा, जोपर्यंत न्याय देण्याच्या