समाजसमतेचे विरोधक - Page 158

११६ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

जोंपर्यंत दाखवून देतां येत नाहीं तोंपर्यंत जातिभेद हा नैसर्गिक भेद आहे असें

म्हणतां यावयाचें नाही.

मनुष्यकृत भेद नाहींसे करणें मनुष्याला अशक्य नाहीं

व सध्यांची सामाजिक विषमता मनुष्यकृत असल्यामुळें ती काढून टाकणें अगदीं शक्य आहें. त्यांवर हे असें म्हणतात कीं, जगांत कोणत्या ना कोणत्या रुपानें थोडी बहुत विषमता केव्हाही राहणारच कंबूल ! परंतु त्याचा अर्थ असा होतों काय कीं कृत्रिम विषमता तशीच राहूं द्यावी, तिला मुळींच धक्का लावूं नयें ? ` तसें जर म्हणावयाचे असेल तर आम्ही उलट विचारितों, निसर्गात नीति कोठें आहे ? जगांतली अनीति पूर्णपणें नाहींशी करणें कधी तरी शक्य आहे काय ? थोड्या बहुत प्रमाणानें जगाच्या अंतापर्यंत जगांत अनीति राहणारच ना ? मग नीतीचा उपदेश कशाला करितां ? नीतितत्त्वांना मान्यता का देतां ? चोरी वगैरे गुन्ह्याबद्दल शिक्षा करावयाचे कायदे कशाला पाहिजेत ? या प्रश्‍नांची उत्तरें समतेचें आक्षेपक देऊं शकतील काय ? जर नीति पाहिजे तर समताही पाहिजे.

समता हैं सार्वजनिक नीतीचें एक मुख्य तत्त्व

आहे. राजकीय, धार्मिक, सामाजिक व आर्थिक बाबतींत समतेचे तत्त्व लागू करणें म्हणजे समाजरचना नीतीच्या पायावर करणेंच होय. परंतु घुबडाला सूर्यप्रकाश सहन होत नाहीं त्यांप्रमाणें सामाजिक विषमतेमुळे ज्यांना जातिश्रेष्ठता मिरवावयास मिळते त्यांना जातिभेदावर कुऱ्हाड पडलेली पाहून साहजिकच संताप येतो. हिंदुसमाज म्हणजे अनेक भेदांची व पोटभेदांची एक उतरंड आहे, आपल्या खालची पायरी कोणाची तरी आहे व आपण वरच्या पायरीवरचे आहों, एवढ्याने प्रत्येक जात खुष असते. जातिभेदाचें समर्थन करणारे लोक जातिदुरभिमानी असल्यामुळें ते समतेच्या भावनेला पारखे झालेले असतात. जातिभेद नाहींसा झाला तर आम्हाला श्रेष्ठता कशी मिरवतां येईल ? अशी त्यांच्या मनाला भीति वाटत असते. म्हणूनच ते समताप्रस्थापनेच्या चळवळीविरूद्ध जळफळत असतात. हिंदुसंघटना यांना पाहिजे ती याच करितां. हिंदुसमाजात आजचे भेद रहावे, विषमता तशीच असावी आणि समाजामध्ये वरिष्ठ वर्ग म्हणून आपल्यास मिरवितां यावे. तसें होत नसेल आणि समता प्रस्थापित होऊन हिदुसमाज जिवंत राहावयाचा असेल तर तो जिवंत न राहिला तरी हरकत नाही. ज्यांना समता पाहिजे असेल त्यांनी खुशाल परधर्मात जावें, एक पीडाच गेली असे आम्ही समजू असेही म्हणावयास हे समताद्वेष्टें कमी नाहीत ! हिंदुसमाज जेव्हां नामशेष होईल