नकटा नकट्याला हांसतो | | - Page 172

५०
नकटा नकट्याला हांसतो !

पुणें येथें रा. वल्लभभाई पटेल यांच्या पुढारीपणाखाली मुंबई इलाख्यांतील जमीनदारांच्या संघाची (The Land Leagues लीगची) नुकतीच स्थापना करण्यांत आली. वल्लभभाईना बोलावून आणण्यांत व सदरील संघाची स्थापना करण्यांत केळकर, भोपटकर प्रभृति ब्राह्मण पुढाऱ्यांनी प्रमुखपणें भाग घेतल्यावरून ब्राह्मणेतर पक्षाच्या पुढाऱ्यांनी त्यांत भाग घेतला नाहीं, इतकेंच नव्हे तर सदरील संघ स्थापण्यांत ब्राह्मण पुढाऱ्यांचा अंतःस्थ हेतु करबंदीची चळवळ करण्याचा आहे त्याअर्थी शेतकरी वर्गानें सावध राहावें व या चळवळींत पडूं नये, असा इषाराहि ब्राह्मणेतर पुढाऱ्यांनी दिला होता. तथापि रा. विठ्ठलराव शिंदे व रा. जेधे हे सदरील संघाच्या स्थापनेच्या वेळीं हजर राहिले होते. ब्राह्मणेतर पुढाऱ्यांनी लँड लीगवर बहिष्कार घातल्यामुळें वल्लभभाई पटेल यांनीं त्यांची पुणें येथेंच एक भाषण करून चांगली हजेरी घेतली. वल्लभभाई पटेल हे स्वत: ब्राह्मणेतर असले तरी ते ' भटाळलेले ' असल्या कारणानें, ज्या ब्राह्मणेतर पत्रकारानी बार्डोली प्रकरणांतील त्यांच्या विजयाबद्दल त्यांचें अभिनंदन केलें होतें, ते ब्राह्मणेतर म्हणून त्यांच्याविषयीं आपलेपणाच्या भावनेनें अभिमान व्यक्त केला होता, तेच ब्राह्मणेतर पत्रकार आतां त्यांच्यावर उलटून पडले आहेत. गुजराथमध्ये दुबळा नांवाची एक जात असून पाटीदार कुणब्यांच्या शेतांत तेच मेहनत करतात, त्यांची बायकामुलें पाटीदारांच्या चाकरींत खपतात, पाटीदार लोक आयतखाऊ व नांवाचे कुणबी आहेत, आणि त्यांनीं दुबळा जातीच्या लोकांना गुलामगिरींत ठेवलें आहे, त्यांच्यावर ते वाटेल तसा जुलूम करितात, तथापि वल्लभभाई पटेल हे आपल्या जातभाईनीं दुबळा लोकांवर चालविलेल्या जुलुमाला आळा घालण्याचा कांहीं प्रयत्न करीत नाहींत, अशा प्रकारची उलट टीका ब्राह्मणेतर पत्रांनी वल्लभभाईवरं केली आहे. वल्लभभाई व त्यांचे जातभाई यांनीं दुबळा जातीच्या लोकांच्या बाबतींत जें स्वार्थापणाचें धोरण दाखविलें आहे त्यांचा आम्हीहि निषेध करितों. दुबळा, काळीपरज ऊफ राणोपरज वगैरे मागासलेल्या लोकांवर हिंदु, पारसी वगैरे सधन वर्गातल्या लोकाकडून भयंकर जुलूम होतो याबद्दल मुळींच शंका नाहीं. तथापि, महाराष्ट्रांतील ब्राह्मणेतर पक्षाने या बाबतींत नाकाने कांदे सोलण्याचा प्रयत्न करणें हैं मात्र हास्यास्पद होय. खोतीपद्धतीमध्यें कुळांवर खोतांचा व त्यांच्या

खालोखाल घारेकऱ्यांचा अतिशय जुलूम होतो हें आतां जगजाहीर झालेलें