सापांत चांभार आहेत कीं माणसांत साप आहेत ? - Page 185

सापांत चांभार आहेत की माणसांत साप आहेत ? १४३

चावल्याबद्दलची खात्री नसेल, असें म्हणावें लागतें. कारण, त्याला दवाखान्यांत ज्यांनी पोचविलें त्यांना ती माहिती नव्हती ; नाहीपेक्षां डॉक्टरांनी त्याला भलतेच उपचार केले नसते. डॉ. कर्णिक यांनी पिठ्याला सर्पदंश झाल्याबद्दल, त्याला मांत्रिकाकडे पाठविण्यापूर्वी स्वत:ची खात्री करून घेतली नव्हती, असेंहि सदरील हकीकतीवरून म्हणावें लागतें.

संर्पदंश पूर्णपणे झाला नाहीं म्हणजे सर्पाचे पुरे विष माणसाच्या अंगांत पडले नाहीं तर त्या विषाचा प्राणघातक परिणाम होत नाहीं आणि विष उतरण्याचे श्रेय मांत्रिकाला किंवा वैद्याला मिळतें. पिठ्याला पुर्ण दंश झाला होता किंवा त्याच्या आंगांत अपुरे विष पडलें होतें, अथवा दंश मुळींच न होतां मनाची भावना किंवा भीति यामुळेच त्याला विष बाधेची लक्षणे होत होती याबद्दल कोणींच स्वत:ची खात्री करून घेतलेली दिसत नाहीं. अपुऱ्या विषाचा परिणाम आपोआपच कांहीं वेळानें कमी होऊ शकेल आणि भावनेचा परिणाम असल्यास मांत्रिकाला फुकटचे श्रेय मिळेल, हें विसरतां कामा नये. या बाबतींत परळ येथील लेबारेटरीमध्यें व इतरत्र शोधक डॉक्टरांनीं जे प्रयोग करून पाहिले आहेत त्यांना, सर्पाचें विष पूर्णपणें अंगांत पडलें असतां तें उतरणारा एकहि मांत्रिक. आढळलेला नाहीं.

मांत्रिकाच्या मंत्रामुळे पिठ्याच्या अंगांत त्याला चावलेल्या सापाचे वारे आलें आणि त्यानें आपली हकीकत सांगितली, हा प्रकार कितपत खरा मानावयाचा याच्या बद्दल थोडा विचार केला असतां, कोणासहि जबर शंका येईल. श्रद्धाळु माणसानें आपल्या अंगांत सापाचे वारें आलें असें समजून उत्तरें देणें अशक्य नाहीं परंतु तीं उत्तरें कितपत्त खरी मानावयाचीं हाच काय तो प्रश्‍न आहे. ज्या वेळीं पिठ्याच्या अंगांत सापाचे वारें येऊन तो बोलत होता, त्या वेळीं त्याच्याच म्हणण्याप्रमाणे साप जंगलांत जीवंत होता. सापाला दोन आत्मे असतात कीं काय ? त्याशिवाय, एकाच वेळीं स्वतःचा देह व दुसऱ्याचा देह अशा दोन ठिकाणीं त्याचें अस्तित्व कसें असूं शकेल ? कीं सापाला परकाया प्रवेशाची योगविद्या अवगत असते ? जीवंत माणसाचे वारें कोणाच्या अंगांत आणतां येत नाहीं, मग जीवंत सापाचें तरी कसें आणतां यावें ?

सापाने आपली जात चांभार म्हणून सांगितलीं. चांभार ही जात धंद्यावरून झालेली आहे. अमुक एका स्वभावावरून जात उत्पन्न होत नाहीं. सुष्टपुष्ट जसे इतर जातींत असतात तसे चांभारातहि असतात. माणसांच्या समाजांत चांभारांचा धंदा हा उपयोगीं धंदा आहे. परंतु सापांत चांभाराचा धंदा काय उपयोगाचा ! सापांना पायच नाहींत मग ते जोडे, वहाणा, बूट कसे वापरणार ? अर्थात सापांत जर कोणती जात मुळींच नसेल तर ती चांभाराची