आमची कैफियत १५१
व आमच्या चळवळीचें चिंतक खरें, प्रकृतिभेदानुसार आम्हांला जहाल किंवा मवाळ समजतात. निष्कारण जहालपणानें वागण्याची किंवा दुसऱ्याची मनें निष्कारण दुखविण्याची आमची इच्छा नाहीं व तसें आमचें धोरणहि नाही परंतु अस्पृश्यता निवारणाच्या चळवळीला जहालपणानें विरोध करणारें लोक असल्यावर प्रसंगविशेषी जहाल झाल्याशिवाय आणि ' अरे तर कारे ' अशा धोरणानें वागल्याशिवाय चालत नाही. जे लोक आम्हांला मवाळ म्हणतात त्यांच्या उत्साहाचें आम्ही मनःपूर्वक कौतुक करतों. परंतु आमच्या अडचणींचा ते विचार करीत नाहींत, एवढेंच आमचें म्हणणें आहे. आपल्या चळवळीचा झगडा होता होईल तों तडजोडीनें कायदेशीर साधनांनी आणि स्वतःच्या पक्षाची कमीत कमी हानी होईल अशा रीतीनें चालवावयाचा असें आमचें धोरण आहे. या धोरणाला अनुसरून आम्ही वागत असतों. या आमच्या जहाल हितचिंतकांकडून आमच्यावर
अवसानघातकीपणाचा आरोप
करण्यांत येतो. वतन बिल डॉ. आंबेडकरांनीं मागें कां घेतलें याचा खुलासा यापूर्वीच” बहिष्कृत भारता ' मध्यें केलेला आहे. तथापि, आंबेडकरांनी बिल मागें घेऊन अवसानघात'केला असें हे टीकाकार म्हणतच आहेत. कायदेकौन्सिलांत एखादें बिल पसार करून घेणें हें परस्वाधीन काम असतें. सरकार, मुसलमान, ब्राह्मण, ब्राह्मणेतर या सर्व पक्षांचे बहुतेक सभासद सदरील बिल हाणून पाडण्यास बद्धपरिकर झालेले होते आणि त्यांत त्यांचे काय काय हेतू होते तें आम्हीं यापूर्वी सांगितलेंच आहे. जेथें हितसंबंधांचा प्रत्यक्ष विरोध येतो आणि इतर बाबतीतले मतभेद लक्ष्यांत आणून अमक्यानें पुढें आणलेलें बिल म्हणून तें हाणून पाडावयास वेगवेगळ्या पक्षांचे लोक एकत्र होतात, तेथें तें बिल पसार होण्याची आशा कशी बाळगावयाची ? आणि विरोधकांचा हेतू कां म्हणून सिद्धीस जाऊ द्यावयाचा ? आंबेडकरांना बिल मागें न घेतां मतांवर घालतां आले असते. परंतु मूळचें बिल नापास होऊनच राहिलें नसतें तर सिलेक्ट कमिटीनें गणपतीच्या मूर्तीचें माकडाच्या मूर्तीत जें रुपांतर केलें होतें ते वतनदार महारांच्या मानगुटीवर बसलें असतें, त्याची वाट काय ? तसें झालें असतें म्हणजे हेच टीकाकार आंबेडकरांनी वतनदार मंडळीला आगीतून बाहेर काढून फोफाट्यांत टाकलें अशी ओरड करावयास तयार झाले असते. महाडचा सत्याग्रह व उमरावतीच्या अंबा देवालयासंबंधाचा सत्याग्रह यांच्या बाबतीतही आंबेडकरांवर अवसान घातकीपणाचा आरोप करणारे कांही लोक आहेत. होतां होईल तों गोष्ट विकोपाला न्यावयाची नाहीं, जेथे नखानें तुटत असेल तेथें कुऱ्हाडीचा उपयोग करावयाचा नाहीं आणि बहिष्कृत वर्गाची शक्ती एखाद्या कामांत सगळी खर्चून टाकून आपल्या चळवळीला