आतां हें चित्र पहा ! - Page 198

१५६ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

नावडता भाग खुंटीवर लावून ठेवावयाचा ! कोणी म्हटलें, महात्माजी काय म्हणतात व स्वत: काय करितात तें तरी पहा. तर त्यावर या मंडळापारीं उत्तर तयार आहेच. लगेच सांगतील कीं, महात्माजींचा हा उपदेश आमच्यासाठी नाहीं. ' न देवचरितं चरेत्‌ ' अथवा ' न साधु चरितं चरेत्‌ ' असें म्हटलेंच आहे. महात्माजींनी अस्पृश्य वर्गातली एक मुलगी आपल्या घरांत स्वतःच्या मुलीप्रमाणे पाळली म्हणून महात्माजींच्या प्रत्येक अनुयायानें आपआपल्या घरीं एक एक अस्पृश्य मुलगी पाळावी असें कोण म्हणतो ? तो ज्याच्या त्याच्या खुषीचा किवा सामर्थ्याचा प्रश्‍न आहे. महात्माजीहि तसें सांगत नाहीं. अस्पृश्यता ही माणुसकीला सोडून आहे, न्यायाला व धर्माला सोडून आहे. म्हणून ती समाजांतून नाहींशी करा, असें महात्माजी सांगतात. मग तेथें ' न देव (साधु) चरितं चरेत्‌ ' हें उत्तर कसें लागू पडतें?

प्रासंगिक विचार : ६ सप्टेंबर १९२९.