आधी कळस, मग पाया ! - Page 202

१६० डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

देशांतील कामगारांची मनोभूमिका क्रांतीसाठी कितपत तयार झालेली आहे याचाच आपण प्रथम विचार करूं. पहिल्यानें आपल्या दृष्टोत्पत्तीस गोष्ट येते ती ही कीं,

|

पुढारी कम्युनिस्ट, पण अनुयायी कम्युनिस्ट नाहींत.

कम्युनिस्टांना जे कामगार आपले पुढारी मानतात ते कम्युनिस्टांचीं सर्व खरी मतें त्यांना बरोबर रीतीनें माहीत नाहींत म्हणून, हें आपण विसरतां कामा नये. कम्युनिझममधून देव, धर्म व राष्ट्र यांना हद्दपार केलेलें आहे. देव, धर्म

व राष्ट्र यां संबंधाच्या कल्पना मतलबी लोकांनीं स्वतःचें श्रेष्ठत्व कायम राखण्याच्या

उद्देशानें बहुजनसमाजामध्ये पसरून ठेवलेल्या आहेत: या कल्पनांचा फायदा भांडवलशाही, जमीनदारशाही व साम्राज्यशाही यांना मिळत आहे' आणि त्या कल्पनांचे निर्मूलन केल्याखेरीज जगांत कायमची खरी शांतता नांदावयाची नाहीं व बहुजनसमाज सुखी व्हावयाचा नाहीं, हा कम्युनिस्टांचा सिद्धांत आहे. पण त्याची कितीशा कामगारांना कल्पना असेल ? देव व धर्म यांच्या संबंधाची ' कम्युनिस्टांचीं मतें उघडपणें प्रतिपादण्यांत येतील तर कम्युनिस्टांना सध्याच्या स्थितींत तरी कामगारांमध्ये एकहि अनुयायी सांपडावयाचा नाहीं. - लेनिनच्या पुतळ्याला किंवा तसबिरीला मान देणाऱ्या कम्युनिस्ट पुढाऱ्यांनी शिवाजी महाराजांची तसबीर यूनियनच्या कार्यालयांत ठेवण्यास हरकत घेतली तेव्हां त्यांचे कित्येक मराठे अनुयायी त्यांच्यावर बिथरले, हें आम्हांला ऐकून ठाऊक आहे. जातिभेद व स्पर्शास्पर्श यांचें बंड कामगारांमध्ये कमी नाहीं. अद्यापि गिरण्यांतल्या पाण्याच्या नळावर अस्पृश्यांना फिरकू न देण्याकडे लाल बावटेवाल्या कामगारांचाहि कटाक्ष असतो व त्यामुळें वरचेवर भांडणें होतात. ज़ातिभेद व अस्पृश्यता हीं कम्युनिझमच्या मूलतत्त्वांना अगदीं सोडून आहेत. लेनिन हिदुस्थानांत जन्मला असता तर प्रथम त्यानें जातिभेद व अस्पृश्यता यांना साफ गाडून टाकलें असतें व तसे केल्याखेरीज क्रांतीची कल्पना त्यानें मनांतहि आणली नसती. वादाकरितां आपण क्षणभर गृहीत करूं कीं, या देशांतील कम्युनिस्टांना क्रांति घडवून आणण्यांत यश आलें. पण ती क्रांति बहुजनसंमाजाला सुखावह होईल काय ? कम्युनिस्टांचें ध्येय असलेली समाजव्यवस्था अंमलात येऊ शकेल काय ? कदाचित्‌, समाजामध्ये विशेषच गोंधळ माजेल, अंतःकलह वाढतील आणि सध्यां दुर्बळ असलेले वर्ग जातिदुराभिमानी प्रबळ वर्गाच्या जुलुमाला बळी पडतील. रशियाप्रमाणें हिंदुस्थानांत सोव्हिएट राज्यव्यवस्था चालू झाली म्हणजे आपोआप जातिभेद नाहींसा होईल, यक्षिणीची कांडी फिरल्याप्रमाणें परिणाम होऊन सामाजिक विषमता आपोआप अदृश्य होईल, असें हिंदी कम्युनिस्टांना वाटतें