एकाक्ष हरिणाची गोष्ट ! - Page 205

एकाक्ष हरिणाची गोष्ट ! १६३

इतकेच नव्हे तर मागाहून घाटाची शुद्धीही कोणी केली नव्हती. या वर्षी तरी देवघाटावर सोवळे फेनाईल उर्फ गोमूत्र शिंपडून आणि नंतर एकादे ब्राह्मणभोजन घालून तो शुद्ध केला जातो किंवा कायं तें पहावयाचें आहे. गांवातल्या लोकांची वर्गणी देण्यास तयारी असल्यास मंत्रपठणपूर्वक व ब्राह्मण-भोजणासहित शुद्धि समारंभ होईल हें सांगावयास नकोच. असो, पनवेल येथें बहिष्कृतांच्या गणपतींचे देवघाटावर विसर्जन करण्यास ज्यांनीं साहाय्य केलें त्या मंडळीचा अस्पृश्य वर्ग आभारी आहे. या बाबतींत श्री. आत्माराम शेठ आटवणे यांना विशेष धन्यवाद दिले पाहिजेत. ते वारकरी संप्रदायांतले आहेत, परंतु त्यांचे धार्मिक व सामाजिक बाबतींतील विचार त्या संप्रदायांतल्या इतर पुष्कळ मंडळीप्रमाणे अनुदार नाहींत. पनवेलची ही उदारमतवादी मंडळी आणि तेथला बहिष्कृत समाज हें प्रकरण येथेंच थांबू न देतां बल्लाळेश्वराच्या देवळाजवळून देवघाटावर जाणारा रस्ता खाजगी असल्याचा जो खोटा दावा दुराग्रही सोवळ्या लोकांनीं पुढें केला आहे त्याचा कायमचा निकाल करून घेईल अशी आम्हांस आशा आहे.

प्रासंगिक विचार : बहिष्कृत भारत, ता. ४ आक्टोबर १९२९.