६५
एकाक्ष हिंदु समाज
इसापनीतींतल्या एकाक्ष हरिणाप्रमाणेंच हिंदु समाज अनेक बाबतींत एकाक्ष आहे. त्याचा एक डोळा रूढीनें फोडून टाकला आहे. हा फुटका डोळा ज्या बाजूस असतों ती बाजू हिंदु समाजाला दिसत नाहीं, इतकेंच नव्हे तर हा फुटका डोळा सोयीप्रमाणे वाटेल त्या बाजूस फिरवून आत्मवंचना करण्याची कला हिंदु समाजानें साध्य केली आहे. इंग्लंडचा आरमारी योद्धा नेल्सन यांची एक गोष्ट अशी सांगतात कीं, लढाई पाहतांना एकदां त्यानें मुद्दाम आपल्या फुटक्या डोळ्याला दुर्बीण लावली होती. आमचे सोवळे वीर नव्या-जुन्याच्या व्रादांत असेंच करीत असतात. फरक इतकाच कीं, नेल्सननें ट्राफल्गारची लढाई जिकलीं आणि यांची मात्र सारखी पिछेहाट होत आहे | हिंदु समाजाच्या धडक्या डोळ्याला अद्वैतवाद व 'शुनिचैव श्वपाकेच ब्राह्मणे गवि हस्तिनि ' हा समतावाद, ' यातिकुळ येथें असे अप्रमाण.' गुणांचें कारण असे अंगी ' हा तुकारामबुवांचा कोटिक्रम दिसतो, परंतु समाजांतील विषमतेकडे त्यानें आपला फुटका डोळा फिरविलेला असतो. धडक्या डोळ्याला राजकीय गुलामगिरी दिसते, परंतु सामाजिक गुलामगिरी फुटक्या डोळ्याच्या वाट्याला आलेली असते. धडक्या डोळ्याला धर्मशास्त्रांतला स्वच्छतेचा उपदेश दिसतो. परंतु ब्राह्मणांच्या पायांचे घाणेरडं पाणी पिण्याने ब्राह्मणेतरांना मोक्षलाभ होतो या शिकवणीचा आचरटपणा फुटक्या डोळ्याने पाहण्यांत येतो. धडक्या डोळ्याला मुसलमान व खिस्ती या धर्माची चढाई दिसते आणि त्यामुळें संघटन व शुद्धि यांची आवश्यकता पटते, परंतु अंतःस्थ विघटना व अंतःशुद्धीचा अभाव पाहण्याच्या वेळेस फुटका डोळा आड येतो. या फुटक्या डोळ्यावर रूढिप्रियतेचा व स्वार्थाचा पडदा आलेला आहे. तो पडदा शस्त्रक्रियेने काढून टाकून डोळा नीट करणें शक्य आहे. परंतु या डोळ्यावर शस्त्रक्रिया करून घेण्यास हिंदु समाज तयार होत नाहीं. कारण या फुटक्या डोळ्याचा आपल्या सोयीप्रमाणें उपयोग caren करतां येतो.
en
प्रासंगिक विचार : बहिष्कृत भारत, ता. ४ आक्टोबर १९२९.