६६
दावर व दराडकर
कम्युनिस्टांचें ध्येय व त्यांचे मार्ग यांच्याविषयी सहानुभूति दाखविणाऱ्या आणि त्यांची बाजू घेऊन, खऱ्या कामगार चळवळीच्या वतींने कम्युनिस्टाना विरोध करणाऱ्या पक्षालाहि शिव्याशाप देऊन आपल्या वर्तमानपत्राच्या प्रती खपवूं पाहणाऱ्या कांही संपादकांनीं रत्नागिरी जिल्ह्यांतील मालवण देवगड नजीक कुणकवळे गांवांत तेथले एक जमीनदार वराडकर यांचा खून झाला तेव्हां मात्र आकाशपाताळ एक केले ! इतकेच नव्हे तर सेशन कोर्टांत वराडकर खुनाच्या खटल्यांतील तीन आरोपींना फांशींची व अकरा आरोपींना जन्मठेपीची शिक्षा झाली तेव्हां सदरील पत्रकारांनी समाधान व्यक्त करण्यासहि कमी केलें
नाहीं. शिक्षा फर्मावलेल्या आरोपींच्या बायका-मुलांसंबंधानें सहानुभूतीचे नक्राश्रू ढाळून या पत्रकारांनी त्या बायका-मुलांना वराडकरांच्या बायकामुलांच्या स्थितीची
आठवण करून दिली आहे. कम्युनिस्टांच्या ' क्रांति ' पत्रानें आपल्या तत्त्वाला
स्मरून वराडकर खुनासंबंधाच्या खटल्याच्या निकालावर जो लेख लिहिला आहे तो वाचून सदरील पत्रकारांना काय वाटलें असेल तें आम्हांस सांगवत नाहीं. ' क्रांती ' च्या या लेखावर टीका करण्याचें धैर्य त्यांना झालें नाहीं एवढें तरी खास ' क्रांती ' चा हा लेख कदाचित् त्यांच्या अवलोकनांत आला नसेल तर त्यांनीं अवश्य वाचून पाहावा. ज्या वेळीं पर्ल मिलमधील difeen मास्तर दावर यांचा गिरणींत कांहीं कामगारांनी खून केला त्या वेळीं या पत्रकारांचा किंवा लेखकांचा अत्याचाराविषयींचा तिटकारा कोठें गेला होता ? दावरला बायको-मुलें नव्हती काय ? दावरच्या खुनांत दोषी ठरलेला पापामिया फाशीं गेला तेव्हा त्याच्या बायको-मुलांना दावरच्या बायको-मुलांची त्यांनीं आठवण करून दिली होती काय? पण दावर त्यांचा जातभाई नव्हता, तो कोंकणांतला किंवा देशावरला जमीनदार किंवा सावकार नव्हता. चायना मिलमधघल्या ज्या तीन पठाण रखवालदारांचे नाहक खून करण्यात आले त्यांच्यासाठीं रडणारीं त्यांच्या कुटुंबातली कोणीच माणसें नसतील काय ? त्या खुनाचा निषेध या पत्रकारांनी कधीं केला होता काय ? हे तीन खून हिंदु मुसलमानांच्या दंग्यापूर्वी झाले होते व आतांपर्यंत प्रसिद्ध झालेल्या माहितीवरून पाहतां त्यांत कांहीं खाजगी द्वेषाचा संबंध होता असेंहि दिसत नाहीं. वराडकरांच्या खुनाला पूर्वेतिहास तरी होता. कुणकवळ्याच्या आरोपीतफें हायकोर्टात अपिलामध्यें अखेर निर्णय काय