दावर व वराडकर - Page 208

१६६ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

होणार असेंल तो होवो, त्या बाबतींत प्रस्तुत आम्हांस कांहीं लिहावयाचें नाहीं. मुख्य मुद्दा एवढाच कीं, स्वार्थी मनोवृत्ति व ' परदुःख शीतळ ' मानण्याचें धोरण यांच्यामुळे न्यायान्यायाच्या कल्पना बदलत असतात. शहरांतली भांडवलशाही काय किंवा खेड्यांतील जमीनदारशाही, खोतशाही किंवा सावकारशाही काय, त्या सर्वाचे धोरण गरिबांच्या रक्‍ताचें शोषण करण्याचें असतें. ज्यांचा खेड्यांतल्या जमीनदारशाहीशीं, खोतशाहीशी किंवा सावकारशाहीशीं प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष हितसंबंध असतो ते शहरांतल्या भांडवलशाहीवर सडकून टीका करितात, कामगारांच्या संबंधाने मोठा कळवळा दाखवितात, कामगारांनी जहाल मार्ग स्वीकारले तर त्यांचे कौतुक करितात, परंतु खेड्यांतले आपल्या जातभाईचें व नातलगांचे राज्यं मात्र तसेंच अबाधित राहिलें पाहिजे असें त्यांना वाटते. शेतकऱ्यांनी पांढरपेश्यांचा जुलूम निमूटपणें सोसला पाहिजे ; त्यांनी आपल्या घरादारांवरचीहि मालकी नाहींशी केली, आपल्या अज्ञानाचा व गरिबीचा फायदा घेऊन आपल्यास हवे तसें नागविलें, आपल्यास व आपल्या बायकां-मुलांना गुलामांप्रमाणे वागविलें, तरी त्यांत संतोषच मानला पाहिजे, असे हे संपादक धरून चालतात.

प्रासंगिक विचार : बहिष्कृत भारत, ता. ४ ऑक्टोबर १९२९.