६७
पांढरपेशांची मतलबी सहानुभूति
गिरण्यांतल्या संपाकडे नुसत्या तिऱ्हाईत दृष्टीनेंच नव्हे तर मतलबी दृष्टीनेंहि पांढरपेशा वर्ग पाहत असतो. मुंबईला येऊन कोंकणांतले व देशावरचे शेतकरी दोन पैसे मिळवितात आणि त्यामुळें गांवांतल्या सावकारांच कर्ज काढण्याचा त्यांच्यावर प्रसंग येत नाहीं. तसेंच जमीनदारांनी जमिनीचा खंड भलतीकडे वाढविला तर मुंबईतल्या प्राप्तीमुळें शेतकरी कुटुंबांना त्या जमिनी पडित टाकणें शक्य होतें. शेतकीमध्ये मुळींच फायदा नाहीं, मेहनत करून मालकाची व सावकाराची भर करावी, असें झाल्यामुळें पुष्कळ शेतकरी कुटुंबे गांव सोडून मुंबईस येऊन राहतात व मोलमजुरी करून पोट भरतात. त्यामुळें जमीनदारांना कुळाचा तुटवडा पडून त्यांच्या जमिनी उत्पन्नाशिवाय पडून राहतात. अर्थात् गिरण्यांत संप होऊन गांव सोडून मुंबईस गेलेले लोक पुनः गावांत आले तर आपल्या जमिनी लागवडीस येतील अशी पांढरपेशा जमीनदारांना आशा असते. त्याचप्रमाणें मुंबईचा आधार नाहींसा झाला म्हणजे शेतकऱ्यांना आपल्याकडें कर्ज मागावयास येणें भाग पडेल व त्यांनी आपल्याकडून कर्ज घेतलें म्हणजे लांड्यालबाङया करून त्यांच्या मालकीच्या जमिनी गहाण विक्रीच्या रूपानें आपल्या घशांत उतरवतां येतील असें पांढरपेशांना वाटत असतें. परंतु त्यांनी पक्के समजून असावें कीं शहरांतली चळवळ केवळ शहरांपुरतीच राहणार नाहीं. शहरांतले कामगार ती चळवळ आपआपल्या खेड्यांपर्यंत नेऊन पोहचवितील आणि शेवटीं जमीनदार, खोत, सावकार यांना ' त्राहि भगवान् ' म्हणण्याची पाळी येइल. शहरांतल्या भांडवलशाहीचा जुलूम पाहून तापणारें रक्त जमीनदारशाही, खोतशाही व सावकारशाही यांचा जुलूम सोसतांना बर्फासारखें थंड राहील असें जर त्यांना वाटत असेल तर तो त्यांचा भ्रम आहे.
प्रासंगिक विचार : बहिष्कृत भारत, ता. ४ ऑक्टोबर १९२९.