हिंदु संस्कृतीचा बागुळबुवा - Page 211

हिंदु संस्कृतीचा बागुलबुवा १६९

मुगटे यांच्यांत गुरफटून राहिली होती, परंतु चक्रीपागोटीं व रेशमी मुगटे आतां फारसे कोठें दिसत नाहींत आणि हॅट, नेकटाय, कॉलर, पाटलोण असा पोशाख रूढ होऊन अंगांत सदरे घालून ब्राह्मण जेवावयास बसतात तरी हिंदु संस्कृति अद्यापि जिवंत राहिलेली आहे. इराण्यांच्या, खिश््चनांच्या व मुसलमानांच्या हॉटेलांमध्यें ब्राह्मणादि जातींच्या लोकांनीं वाटेल त्या पदार्थावर ताव मारला आणि परदेशांत जाऊन तेथल्या लोकांबरोबर सहभोजन करून व त्यांच्या हातचें अन्न खाऊन इकडे शेकडों लोक आले तरी हिंदु संस्कृति नामशेष झालेली नाहीं. फक्त महार चांभारांबरोबर सहभोजन केल्यानेंच ती रसातळास जाणार आहे ! हिंदु संस्कृति म्हणजे जातिभेदाचे बंड अशीच जर व्याख्या असेल तर हिंदु संस्कृति जितक्या लवकर नामशेष होईल तितकें या देशाच्या व साऱ्या जगाच्या प्रगतीच्या दृष्टीनें चांगलें असें कोणता विचारी मनुष्य म्हणणार नाहीं ? म्हणें, सबगोलंकार हेंच जर अस्पृश्यतानिवारणाच्या चळवळीचे ध्येय असेल तर भेटीव्यवहारापुरती अस्पृश्यता असूं नये असें म्हणणाऱ्या लोकांना या बाबतींत पुनः विचार करावा लागेल! करा, खुशाल विचार करा, अगदीं वस्त्रगाळ विचार करा. तुमचा विचार संपेपर्यंत जग बरेंचसें बदलून जाईल. तुमच्या ढोंगी सहानुभूतीची बहिष्कृतांना तरी पर्वा कशाला पाहिजे ? सहभोजनाचा धूमधडाका सुरू झाला तेव्हां कोठें आमची भेटीव्यवहाराला हरकत नाहीं ' असें तुम्ही म्हणूं लागलां आणि आमची खात्री आहे कीं, मिश्रविवाहांचा धूमधडाका सुरू झाला म्हणजे ' आमची रोटीव्यवहारापर्यंत हरकत नाही ' असें तुम्हीच म्हणाल. जगाच्यामागे तुमच्या हिंदुसंस्कृतीचें रहस्य दहावीस पावलें राहण्यास सांठवलेलें आहे, तुम्ही आपखुशींने पुढें पाऊल टाकणारे नाहींत, तुम्हांला दुसऱ्यांनी खेचून पुढें न्यावें लागतें, हे काय आम्हांला ठाऊक नाहीं ?

प्रासंगिक विचार : बहिष्कृत भारत, ता. ४ ऑक्टोबर १९२९.