पुणे येथील पर्वती सत्याग्रह प्रकरण - Page 215

पुणे येथील पर्वती सत्याग्रह प्रकरण १७३

वैचित्रपूर्वक अशी एकादी कोणती गोष्ट असेल तर ती पुण्यांतील अर्धवट नवमतवाद्यांची वर्तणूक ही होय. या पुणेरी नवमतवाद्यांत दोन पक्ष आहेत. एक समाजकारणासाठी अस्पृश्यता निवारक मंडळासारखें अस्पृश्यांचे पुरस्कर्ते म्हणविणारे व दुसरे राजकारणासाठीं अस्पृश्याबद्दल सहानुभूती दाखविणारे केळकराखारखे राजकीय पुढारी हे होत. या लोकांची स्वतः सत्याग्रह करण्याची तयारी नव्हती हें त्यांनीं जाहीर केलें आहे. तथापि सत्याग्रही लोकांना जी हाणमार करण्यांत आली ती देखील आपणास मान्य नाहीं असें हे लोक मोठ्या पोक्तपणानें सहानुभूतीचा आव आणून सांगत आहेत. परंतु या लोकांना आम्ही असें विचारतो कीं, तुमची ही हळहळ व सहानुभूति जर वरवरची नसेल तर हा अनर्थ टाळण्यासाठी तुम्ही काय केलें ? अस्पृश्य सत्याग्रहींना विरोध करावयाचा असेल तर त्यांत देहदंडनाचा समावेश होऊं नये अशी शिकवणूक देण्यासाठीं पुण्यांत एखादी तरी सभा भरवून शांततेचा उपदेश तुम्हीं केलात काय ? यांना सत्याग्रह करावयाचा नव्हता तो त्यांनीं केला नाहीं त्याबद्दल आम्ही त्यांना दोष देतं नाही. परंतु त्यांना निदान सत्याग्रही अस्पृश्य लोकांना विरोध करतांना अनत्याचारपूर्वक विरोध करावा एवढी तरी चळवळ करतां आली नसती काय ? एवढें जर त्यांनीं केलें असतें तर अस्पृश्यांचा सत्याग्रह सिद्धीसही गेला असतां असे आम्हास वाटतें. कारण मारहाणीचा प्रकार नाहींसा झाला असतां तर अखेर सामना झाला असतां तो निष्ठेचाच झाला असतां आणि त्या निष्ठेच्या सामन्यांत अस्पृश्य सत्याग्रही कसास उतरले नसतें असें कोणासही म्हणतां येणार नाहीं. हिंदुसमाजाचे पुढारी म्हणविणाऱ्या या शिष्टांनी हे तर केलें नाहींच परंतु अस्पृश्यांचा सत्याग्रहच होऊ नयें म्हणून त्यांच्या मार्गात अडचणी मात्र उत्पन्न केल्या. असो ! वरील दोन पक्षांपैकीं पहिल्या म्हणजे पर्वती देवालय प्रवेशाचे सूतउवाच करणाऱ्या पक्षावर विशेष जबाबदारी होती हें कोणीही सांगू शकेल. परंतु आश्चर्याची गोष्ट ही कीं, ज्या दिवशीं पर्वती पंचांनी आपला खुलासा जाहीर केला त्याच दिवशीं अस्पृश्यता निवारक मंडळानेंही जाहीर रीतीनें पुणेंकरांस कळविलें कीं, सत्याग्रहाच्या चळवळीशी आपला अगर आपल्या मंडळींचा कोणताही संबंध नाहीं. आपण तिचा आरंभही केलेला नाहीं किंवा तिला प्रोत्साहनही दिलेलें नाही. अशा रीतीने स्वतः केलेली मागणी सार्थ करण्याच्या जबाबदारीतून आपलें अंग काढून घेतल्यानंतर त्याची सर्व जबाबदारी स्थानिक अस्पृश्य वर्गावर साहाजिकपणेंच येऊन पडली.

वाय ६४१ - १४