१७४ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
पंच व ढोंगी केवारी यांचे संगनमत.
पर्वती पंचांचा खुलासा व अस्पृश्यता निवारक मंडळाचा खुलासा हें दोन्ही खुलासे एकाच तारखेस प्रसिद्ध होतात ही गोष्ट मुळांतच विचित्र अशी दिसते पंच व अस्पृश्यता निवारक मंडळ या उभयतांत आदल्या दिवशीं विचार विनिमय होऊन अस्पृश्यता निवारक मंडळाच्या मनाचा ठाव घेतल्यानंतरच पंचानीं नकारार्थी उत्तर दिलें असें म्हटलें असतां तार्किक दृष्ट्या तें अयुक्त होईल असें आम्हांस वाटत नाहीं. तसें जर नसतें तर ज्या दिवशीं पुणें येथील अस्पृश्यांनी आपण सत्याग्रह करूं असें जाहीर केलें, त्याच दिवशीं या सत्याग्रहास आपली संमती नाहीं व त्यास आपण कोणत्याहि प्रकारचा पाठिंबा देणार नाहीं असें अस्पृश्यता निवारक मंडळास जाहीर करण्यास काय हरकत होती ? तसें जर झालें असतें तर ट्रस्टींशीं संगनमत करून अस्पृश्यांचा विश्वासघात केल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यास वस्तुस्थितीमुळें जें कारण सांपडतें तें सांपडलें नसतें. शिवाय अस्पृश्य लोकांना अस्पृश्यता निवारक मंडळ आपल्याला कोठपर्यंत सहाय्य करण्यास तयार आहे याचा वेळींच उलगडा होऊन, प्रसंगी कोणावर विसंबून रहावें लागेल याचा अंदाज करतां आला असता. तसें न करण्यात अस्पृश्यता निवारक मंडळाची शुद्ध फसवेगिरी आहे असें मोठ्या दिलगिरीनें म्हणावें लागते.
नीच कुटील भेदनीति !
अस्पृश्य वर्गाच्या फसगतिवरच ही गोष्ट थांबली असती तरी पुरें झालें असतें. परंतु दुर्दैवाने तसें झालें नाहीं. अस्पृश्यतानिवारक मंडळाचा पाठिंबा गेला तो गेलाच पण त्याचबरोबर पुणें येथील अस्पृश्य वर्गांत फाटाफूट पाडण्याचा प्रयत्न करण्यांत आला. पुणें येथें मातंग समाजाचे पुढारी म्हणविणारे रा. सकट यांनी सत्याग्रहाशीं आपला कोणत्याही प्रकारचा संबंध नाहीं असें जाहींर करून अगदीं आयत्यावेळी सत्याग्रही लोकांना दगा दिला. त्याच प्रमाणे पुण्यांतील हरळे चांभार समाजाच्या कांही पुढाऱ्यांनी आपण या सत्याग्रहांत भाग घेण्यास तंयार नाहीं असें जाहीर केलें. आणि सर्वांत खेदाची गोष्ट म्हणजे ही कीं, ज्या अस्पृश्य वर्गांतील महार जातीवर ती बहुसंख्यांक असल्या कारणानें सहजगत्या सर्वप्रकारची जबाबदारी येऊन पडते त्या महार' जातीतील ६०-६५ लोकांच्या सह्मांचें एक पत्र केसरीत प्रसिद्ध करून महार जातीचा सत्याग्रहास विरोध आहे असे जाहीर करण्यांत आले. ह्या सर्व फाटाफुटीच्या गोष्टी आपखुशींने झाल्या किंवा कोणी तरी कारवाई करून त्या घडवून आणल्या ही गोष्ट विचार करण्यासारखी आहे. आमची खात्री आहे की, अस्पृश्यांतील ही फाटाफूट