१७६ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
दिवस त्या सत्याग्रहाला विरोध करा. धक्काबुक्कीत शारिरीक त्रास सोसल्याचें श्रेय, खरें अगर निदान वर्तमान पत्रांत जाहीर होण्यापुरतें, त्यांना लाभूं द्या आणि शेवटीं, स्वेच्छेनें नव्हे या पराक्रमी मंडळीच्या पराक्रमापुढे हतबल होऊन मी देऊळ उघडले असें म्हणा ! म्हणजे अस्पृश्यता निवारणहि साधेल आणि राजभोज संप्रदायाचे पराक्रम श्रेयही साधेल ! “ ज्या स्पृश्य हिंदुंची आपखुषीनें देवळें खुली करण्याइतकी दानत असेल त्यांना अशी भाषा कदाचित शोभेल. पण ज्यांच्यांत तशी दानत नाहीं त्यांनीं एवढा आव आणणें म्हणजे दैत्यानें स्वतःस देव म्हणवून घेण्यासारखें आहे. परंतु वरील म्हणण्यांत कांहीं तथ्यांश असला तरी देखील अस्पृश्यांनी स्वतःचे हक्क कमाविण्याच्या बाबतींत याचकवृत्तीचा परिपोष का करावा ? आपल्याला सकाळ संध्याकाळ फुकट सुग्रास अन्न मिळत असतांना, तें न घेतां स्वकष्टार्जित आर्धी भाकर मिळविण्याचा जो कोणी मनुष्य प्रयत्न करतो त्यास परान्नपुष्ट ब्राह्मणांखेरीज कोणी दोष देईल असें आम्हांस वाटत नाहीं. मग याचकवृत्तीची संभावना न करतां क्षात्रतेज प्रगट करून जर अस्पृश्यांनी आपलें हक्क मिळविण्याचा प्रयत्न केला तर त्यांना ठपकां कां देण्यांत यावा हें आम्हांस कळत नाहीं. शिवाय सत्याग्रह करणाऱ्यांचा हेतु कितीही दोषास्पद असला तरी त्यांचे ध्येय त्या योगें कसें दूषित होऊं शकते हेंच आम्हांस कळत नाहीं. साधनांचा बरें वाईटपणा हा सर्वस्वी त्याच्या परिणामाकडे पाहूनच ठरविला पाहिजे. अर्थात सत्याग्रहाच्या विरूद्ध, ही जी सबब सांगण्यांत आली आहे ती सर्वथा पोकळ आणि लबाडीची आहे. असेंच म्हटले पाहिजे. सत्याग्रहाला विरूद्ध सांगण्यांत आलेली दुसरी सबबहि त्याच मासल्याची आहे.
मतपरिवर्तनाची सवय.
ती सबब ही कीं, अस्पृश्यता निवारणाचा प्रश्न हा मतपरिवर्तनानेंच सोडविला पाहिजे तो सत्याग्रहानें सोडविला जाणार नाहीं; व सत्याग्रहाने सोडविण्यास गेलें असतां तो अधिकच बिकट होईल. अस्पृश्यता निवारण म्हणजे स्पृश्य हिंदूंचे मत परिवर्तन ही गोष्ट आम्हांसही पटते; पण सत्याग्रह व मतपरिवर्तन हे दोन मार्ग अगदीं भिन्न व परस्पर विरोधी आहेत, हें मात्र कबूल करावयास आम्ही तयार नाहीं. ज्या लोकांनी मतपरिवर्तनाचा एवढा मोठा महिमा गाण्यास आरंभ केला आहे त्या लोकांनीं मतपरिवर्तन करण्याचे मार्ग कोणते हे तरी एकदां निश्चितपणे सांगावे. व्याख्यानादि उपायांची मात्रा हिंदु जनतेवर केव्हांही लागू पडणें शक्य नाहीं याचा अनुभव सर्वांना येऊन चुकला आहे; कारण हिंदु जनता ही रामदासानें सांगितल्याप्रमाणें सिद्ध, साधक किंवा मुमुक्षु या कोणत्याच वर्गात येऊं शकत नाही.