अस्पृश्यांची पुंडाई की स्पृश्याची गुंडाई ? - Page 226

99
अस्पृश्यांची पुंडाई की स्पृश्यांची गुंडाई ?

पर्वती सत्याग्रहाला ' पुंडाई ' म्हणण्यापर्यंत ज्याची मजल गेली आहे त्याला अस्पृश्यतानिवारणाची जोरदार चळवळ म्हणजे भयंकर समाजक्रांतीची चळवळ दिसावी हें स्वाभाविकच आहे. या टीकाकारांना सनातन्यांची गुंडाई दिसत नाहीं. ज्यांनीं पूर्ण शांतता स्वीकारून घाणेरड्या शिव्यागाळी, काठ्यांचा मार, आणि दगडांचा व वहाणांचा वर्षाव निमूटपणें सहन केला ते पुंड आणि ज्या गुंडांनी या अनृत्याचारी लोकांवर अत्याचार केलें ते मात्र सत्वगुणाचे पुतळें ! खासा न्याय ! ' संताची शिकवण ' अशी विपरीत न्यायबुद्धि उत्पन्न करणारी असतें काय ? सत्याग्रही लोक महमुद गझनीप्रमाणें मूर्तिमंजन करावयास निघाले होते काय ? देवदर्शनाच्या हक्काची आकांक्षा आणि त्या आकांक्षेच्या उत्कटतेमुळे आणि समान हक्कांच्या तीव्र जाणिवेमुळे ' कार्य वा साधयेत्‌ देह वा पातयेत्‌ ' अशा निर्धाराने अनत्याचार व अप्रतीकार यांची कास धरून करण्यांत आलेला सत्याग्रह यांना जर पुंडाई म्हणावयाचें तर एकनाथ, चोखामेळा वगैरे पूर्वीचे साधू आणि वर्तमानकाळांतील महात्मा गांधोंसारखे पुढारी यांचीहि पुंडांमध्येंच गणना करावी लागेल ! हल्लींचा देवालयप्रवेशासंबंधाचा अस्पृश्यांचा सत्याग्रह हा या साधुमहात्प्यांच्याच शिकवणीचा परिणाम आहे.

प्रासंगिक विचार : बहिष्कृत भारत, ता. १५ नोव्हेंबर १९२९.