७२.
आतां तरी डोळे उघडले काय ?
डॉ. आंबेडकर व ' बहिष्कृत भारत ' यांच्यावर वैयक्तिक कारणांमुळे असंतुष्ट झालेल्या किंवा बहिष्कृत वर्गातल्या पोटभेदांचे स्तोम माजवून पुढारी म्हणून मिरविण्यास हपापलेल्या कांहीं लोकांनीं अस्पृश्यता निवारणाच्या प्रच्छन्न व अप्रच्छन्न शत्रूंशी संगनमत करण्यास आतांपर्यंत कमी केलें नाहीं. स्वजनद्रोहाचें पाप करण्यास न कचरणाऱ्या या अदूरदृष्टी लोकांचा या शत्रूंनी आतांपर्यंत यथेच्छ उपयोग करून घेतला ; परंतु पर्वती सत्याग्रहामुळें आपले खरे मित्र कोणते, खोटे मित्र कोणते आणि खरे शत्रु कोणते तें आतां बहिष्कृत वर्गाला चांगल्या रीतीनें कळून Yoo आहे. पुण्या-मुंबईच्या, ' हुरळली शेळी आणि गेली लांडग्याचे पाठीमागून ' या न्यायाने वागणाऱ्या आणि कोणत्याही वर्तमानपत्रांत कसल्याही निमित्तानें स्वतःचे नांव फडकलें कीं, आपले बेचाळीस पूर्वज स्वर्गास गेल्याची धन्यता मानणाऱ्या लोकांची खोड त्यांच्या. मतलबी स्पृश्य दोस्तांनी, देवालय प्रवेशाच्या सत्याग्रहाला पुंडाई म्हणून आणि सत्याग्रहाची चळवळ हाणून पाडण्याकरितां चोरटीं उघड कारस्थाने रचून चांगलीच मोडली आहे !
'' यःस्वपक्षं परित्यज्य परपक्षं निषेयते |
सःस्वपक्षे क्षयं याति पश्चातैरेव हन्यते || “'
(जो मनुष्य स्वजनांचा पक्ष सोडून परपक्षाला जाऊन मिळतो तो स्वपक्षांतून नष्ट होतोच पण शेवटीं परपक्षाकडून त्याचा नाश केला जातो) हैं वाल्मीकि ऋषीचें वचन आतां तरी, खाजगी द्वेष, महत्वाकांक्षा किंवा असूया यांना बळी पडून आपल्या वर्गाच्या हितशत्रूंच्या बगलेंत शिरणाऱ्या बहिष्कृतांनीं पूर्णपणें लक्षांत sare.
प्रासंगिक विचार : बहिष्कृत भारत, ता. १५ नोव्हेंबर १९२९.