भाविष्यवादी भालाकर भोपटकर ! - Page 228

93
भविष्यवादी भालाकार भोपटकर |

पर्वती सत्याग्रहाचा निषेध करण्यासाठीं पुणें येथे सनातन्यांची एक सभा हल्लीं भरली होती. त्या वेळी भाषण करतांना भालाकार भा. व. भोपटकर यांनीं, बहिष्कृत वर्गाला देवालयप्रवेशाची मुभा मिळण्यास आणखी दोनशें वर्ष लागतील, असें भविष्य वर्तविले. एकूण आशेला कांहीं जागा आहे म्हणावयाची ! जगाच्या अंतांपर्यतसुद्धां बहिष्कृतांना हिंदुदेवालयात जाण्यास मिळणार नाहीं असें भविष्य मोपटकरांनीं सांगितलें असतें तर त्यांचे तोंड कोण धरणार होता ? हें गणिताच्या आधौरानें वर्तविलेलें भविष्य आहे की फक्त त्यावरून भोपटकरांची तशी इच्छा (wish is father to thought) आहे असे समजावयाचे ? दोनशें वर्षांनी बहिष्कृतांना देवळांत घ्यावयास हरकत नाहीं असें जर भों भों भोपटकरांचे म्हणणें असेल तर बहिष्कृतांना देवळांत जाण्यास मनाई करण्यांस तत्वाचा किंवा धर्मशास्त्राचा आधार नाहीं हैं त्यांनीं अप्रत्यक्षपणे कबूल केलें आहे असेंच म्हटलें पाहिजे. कारण दोनशेंच काय पण दोन हजार वर्षे गेलीं म्हणून जें खरोखर नीतिबाह्य असेल तें थोडेंच नीतिशुद्ध ठरणार आहे ? यात जर नीतिअनीतीचां प्रश्‍न नसेल तर दोनशे वर्षांची तरी मर्यादा कशाला ? लोकमतच्या प्रतिकूलतेचीच अडचण असेल तर भोपटकरांसारख्याँनीं शिंगें मोड्न वासरांत न शिरतां बहुजनसमाजाला छातीठोकपणे खरें तै सांगावें व लोकमत अनुकूल करून द्यावे. परंतु अशा रीतीनें गंभीरपणें कोटिक्रम कोणाशीं करावयाचा ? ' बफून ' भोपटकरांवर असल्या -कोटिक्रमांचा कांहीं परिणाम होणार नाहीं. गाईंना ज्याप्रमाणें. कावळ्याच्या शापामुळें मरणाची भीति बाळगण्याचे कारण नाहीं त्याप्रमाणें भास्कर (बाष्कळ ?) भोपटकरी भविष्याची बहिष्कृतांच्या सत्याग्रह चळवळीला बाधा होण्याची भीति बाळगावयास नको. हिंदी लोकांनीं निर्भळ स्वातंत्र्याची गोष्ट सोडूनच द्यावी, परंतु डोमिनियन स्टेटस्‌ मिळण्यालाहि आणखी दोनशें वर्षे त्यांनीं वाट पाहिली पाहिजे, असें जर एखादां इंग्रज म्हणेल तर ते भौ भो भोपटकरांच्या वरील म्हणण्याइतकेंच संयुक्तिक ठरेल हें काय सांगावयास पाहिजे ?

७७७

प्रासंगिक विचार : बहिष्कृत भारत, ता. १५ नोव्हेंबर १९२९.