७४
ब्राह्मणांच्या मुली मागणारे अस्पृश्य !
पुण्याच्या सनातन्यांनी भरविलेल्या सत्याग्रहनिषेधक सभेंत, बहिष्कृत समाजाच्या आकांक्षांविषणीं अज्ञजनसमाजाचा गैरसमज करण्याच्या उद्देशानें कित्येक वक्त्यानी अशा अर्थाची भाषणें केलीं कीं ” अस्पृश्य लोक स्पृश्य हिंदूंच्या देवळांत प्रवेश करूनच स्वस्थ बसणार नाहींत, ते आतां ब्राह्मणांच्या मुलीही मागू लागले आहेत, तुम्ही त्यांची तीहि आळ पुरविणार काय ? ” बाष्कळ भोपटकरांनीं तर या बाबतींत डॉ आंबेडकर यांच्या नांवाचा उल्लेख करण्यासही कमी केलें नाहीं ! या आरोपाची उपपत्ति अशी दिसते कीं, ज्या अर्थी डॉ. आंबेडकर हे समाजसमतावादी आहेत आणि जातिभेदाचे निर्मूलन करून हिंदुसमाजामधील सर्व वेगवेगळ्या जातींत भेटीव्यवहारच नव्हे तर रोटीबेटीव्यवहार होण्यासही आडकाठी असतां क्रामा नये असें प्रतिपादितात ; त्या अर्थी अस्पृश्य लोक ब्राह्मणांच्या मुली मागतात असें मानावयास हरकत नाहीं । याचें नांव तकंशास्त्र | जातिभेदाला शास्त्राचा व युक्तीचा आधार नाहीं, मनुष्य स्वभावांतल्या हीन वृत्तीमुळे अस्तित्वांत आलेली ती एक संस्था आहे, भौतिक शास्त्राच्या दृष्टीनें जातिभेद कृत्रिम ठरतो, अतएव तो अधर्म्य व त्याज्य आहे, असें डॉ. आंबेडकर व इतर समाजसमतावादी यांचें प्रामाणिक मत आहे : तसेंच विषमतेच्या पायावर उभारलेल्या जातिभेदाच्या इमारतीचा कळस म्हणजे अस्पृश्यता आहे, असेंहि सर्व समतावाद्यांचें स्पष्ट मत आहे. समतावाद्यांमध्यें आंबेडकरांसारखे बहिष्कृत वर्गातलेच लोक नाहींत तर ब्राह्मण व ब्राह्मणेतर स्पृश्य हे सुद्धां आहेत. समाजसमतावाद आंबेडकरांनीं नवा निर्माण केलेला नाहीं. हा समतावाद वज्रसूचि] उपनिषदांत आहे, महाभारतांतल्या धर्मनहुष संवादांत आहे, साधुसंताच्या वचनांत आहे आणि आधुनिक काळीं राजा राममोहनराय, स्वामी दयानंद, स्वामी विवेकानंद, स्वामी रामतीर्थ, रानडे, भांडारकर, राजारामशास्त्री भागवत, दि. ब. आर. रघुनाथराव अशा हिंदुधर्मशास्त्राचें मंथन केलेल्या थोर विद्वान् पुरुषांनी हल्लींची जातिभेदपद्धती कृत्रिम, अशास्त्र विषमतामूलक व समाजाच्या प्रगतीला अडथळा आणणारी आहे असें स्पष्टपणें प्रतिपादिले आहे. जातिभेद नष्ट झाल्यावर ब्राह्मण-ब्राह्मणेतर,
[पाहा परिशिष्ट क्रमांक : १३.