१८८ डॉ. बावासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
अस्पृश्य हे भेद आपोआप नष्ट होतील. जेथें हल्लींच्या अर्थानें ब्राह्मणहि कोणी नाही व अस्पृश्यहि कोणी नाही तेथें ' ब्राह्मणांच्या मुली [' ] व [' ] अस्पृश्यांची मागणी [' ] अशा प्रकारची भाषा आपोआपच खुंटते. अद्वैतानुभव व्यक्त करावयास द्वैताची भाषा उपयोगीं पडत नाहीं त्यांतलीच ही गोष्ट आहे. समतावादामुळें समाजांतलीं वेगवेगळीं कामें थबकून राहण्याची भीति नाहीं. ज्यांप्रमाणें ज्याची प्रवृत्ति, कार्यक्षमता व पात्रता असेल त्याप्रमाणें तो समाजांतलें
विचारप्रवर्तनाचें, शास्त्रीय संशोधनाचे, वाङमयसेवेचें, राष्ट्रीय संरक्षणाचे, समाजसेवेचे, संपत्तीच्या उत्पादनाचे किंवा विनिमयाचे, अथवा दुसरें कांहीं काम करील. परंतु जातिविशिष्ट उच्चनीचपणाला अवकाश राहणार नाहीं. अशी समता प्रस्थापित झाल्यास आपल्यास आपल्या जातीच्या सबबीवर जो उच्चपणा मिरवावयास मिळतो तो मिळणार नाहीं, अशी ज्यांना भीति वाटते ते लोक अर्थातच, समतावादाचा जोरानें पुरस्कार होऊं लागला म्हणजे अस्पृश्य लोक ब्राह्मणांच्या मुलीं मागू लागले आहेत अशी ओरड करूं लागतात ! खरें म्हटलें असतां, या धूर्ताना ठाऊक असतें कीं, हल्लींचा काळ मुली मागण्याचा नाहीं आणि कोणीं मागणी घातली म्हणून ती मान्य करावयास दुसरा बांधलेला नाहीं. जातीतल्या जातींत सुद्धां मागणी घातली म्हणून मुलगी मिळते असें नाहीं. परंतु अशिक्षित लोकांची मनें चिथाविण्याला ही ओरड चांगली उपयोगीं पडेल, अशा कावेबाजीनें मुद्दामच ही ओरड करण्यांत येते.
@ © ©
प्रासंगिक विचार : बहिष्कृत भारत, ता. १५ नोव्हेंबर १९२९.