नरसोबाच्या वाडींत अस्पृश्यांना देवदर्शन - Page 231

७५
नरसोबाच्या वाडीत अस्पृश्यांना देवदर्शन

श्रीक्षेत्र नरसोबाची वाडी हें महाराष्ट्रांतील श्रीदत्तात्रयाचें एक सुप्रसिद्ध स्थान असून या देवळांत पूजा करण्यासंबंधानें ब्राह्मणेतरांनीं चळवळ चालविली होती. त्या चळवळीला पुजारी व पुराणमतवादी मंडळी यांनीं दुराग्रहानें विरोध केला आणि या भांडणाचे पर्यवसान मारामाऱ्या व फौजदारी खटले यांमध्यें झालें. तथापि, या भांडणाचा शेवट गोड झाला ही समाधानाची गोष्ट होय. देव्हाऱ्याला कठडा घालावा, त्या कठड्याच्या आंत जाण्याची ज्याची पूजेची पाळी असेल तो पुजारी व त्याचे पूजेच्या कामांतलें मदतगार यांच्याखेरीज दुसऱ्या कोणाला परवानगी असूं नये आणि कठड्याबाहेरून ब्राह्मण, ब्राह्मणेतर, व बहिष्कृत अशा सर्व जातींच्या हिंदूंनी दर्शन घ्यावें, असें तडजोडीनें ठरलें. या तडजोडींत सर्व हिंदूंना पूजा करण्याचा हक्क न ठेवता ब्राह्मणांचाहि पूजेचा हक्क काढून घेण्यांत आला ही एक प्रकारची पिच्छेहाटच झाली ; तथापि बहिष्कृत हिंदूंना देवळांत जाण्यास सुद्धां मनाई होती ती दूर झाली. त्यामुळें अस्पृश्यता निवारणाच्या बाबतींत एक पाऊल पुढें पडलें असें समजावयास हरकत नाहीं. विशेषतः नरसोबाच्या वाडींतील देवस्थान हें पंढरपूर वगैरे देवस्थानापेक्षां सोवळेपणाच्या बाबतींत कडक म्हणून प्रसिद्ध असतांहि त्या ठिकाणीं देवालयाची द्वारें बहिष्कृत वर्गाला खुलीं करण्यांत आलीं, त्यामुळे इतर ठिकाणच्या देवालय प्रवेशासंबंधाचा प्रश्‍न सुटण्यास सहाय्य होण्याचा बहिष्कृतांना संभव आहे. नरसोबाच्या वाडींतल्या कडक सोंवळे पाळणाऱ्या देवस्थानामध्ये जी सवलत बहिष्कृत हिंदूंना मिळते ती पुण्याच्या पर्वती देवस्थानासारख्या, युरोपियन वगैरे अहिंदु लोकांनींहि विशिष्ट मर्यादेपर्यंत देवळांत जाण्याची जेथें वहिवाट आहे आणि जेथें देवांच्या चांदी सोन्याच्या मूर्ती आसनावरून उचलून युरोपियन लोकांना पंचाच्या आज्ञेने दाखविण्यांत येतात तेथें बहिष्कृत मानलेल्या हिंदूंना कां मिळूं नये ? हा प्रश्न आतां प्रत्येक निःपक्षपाती व दुराग्रही रहित हिंदूंच्या मनांत उत्पन्न झाल्याखेरीज राहणार नाहीं.

00e

प्रासंगिक विचार : बहिष्कृत भारत, ता. १५ नोव्हेंबर १९२९.

वाय ६४८६ - १५