भाकरी मागितली-दगड दिला ! - Page 236

१९४ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

मिरवणुकीची तयारी करण्यांत सर्वजण गुंतले असतांना एक अवचित आणि अनिष्ट बातमी सत्याग्रह कॅम्पांत कळली गेली. सत्याग्रह चळवळीचे एक कार्यकर्ते आणि नाशिकचे सन्माननीय पुढारी श्री. सावळाराम दाणी यांची आई मृत्यूमुखी पडली. त्यांच्या शोचनीय मृत्यूची बातमी सत्याग्रह कॅम्पांत कळतांच प्रत्येकांना दुःख झालें. सत्याग्रह कमिटीची तातडीची सभा भरवून या दुःखप्रद प्रसंगानिमित्त

आज रोजी निघणारी अस्पृश्यांची प्रचंड मिरवणूक रद्द करण्यांत आली.

सायंकाळी सत्याग्रह कमिटीची दुसरी एक सभा भरविण्यांत आली. या सभेंत रामनवमीच्या दिवसापासून सुरूं होणाऱ्या सत्याग्रहासाठी काळेराम मंदिराजवळील पंचवटी मुक्कामी एक सत्याग्रह छावणी उभारण्यांचें ठरले. आणि तीन तीन इसमांच्या तुकडीने काळेराम मंदिरांत देवदर्शनास जाण्यासाठी सत्याग्रह करण्याचें ठरलें. अस्पृश्य लोकांचे हें ठरलेलें धोरण पाहून सनातनी आपल्या परीनें सत्याग्रही मंडळींना प्रतिकार करण्याच्या तयारींत गुंतलें आहेत. मंदिराच्या चार दरवाजांपेकी फक्त दोनच दरवाजे उघडे ठेवण्यांत आले आहेत. दर्शनास येणाऱ्या प्रत्येक इसमास त्याची प्रथम जात विचारण्यात येते.

रात्रौ अस्पृश्यांच्या जाहिर सभेंत जनता पत्राचे संपादक श्री. देवराव नाईक यांचे सत्याग्रहाच्या लढ्यासंबंधी विस्तारपूर्वक असें भाषण झालें. त्यांनी सर्वांना शिस्तीने व शांततेनें वागण्याची विनंती करून हा सत्याग्रह संग्रामाचा लढा नेटानें आणि संघटणेच्या बळकटीने लढविण्याविषयी विनंती केली.

काळेराम मंदिराच्या आसपासचें एकंदर वातावरण केव्हां व कसें विकोपास जाईल याचा कांहींच नेम नसल्यामुळें पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेविला गेला आहे. रात्रभर निरनिराळ्या भीतिदायक अफवा सत्याग्रह छावणींत पसरविण्याचा प्रयत्न करण्यांत आला ; परंतु सत्याग्रही वीर असल्या धमकावण्याला किंवा भीतिदायक बातम्याला किंमत देण्याइतकै कमकुवत नव्हते. त्यांचा संकल्प कायम असून ते आपला आंखलेला कार्यक्रम शिस्तीनें व धैर्याने पार पडण्याच्या तयारीत आहेत.

सत्याग्रह संग्रामाची मोहीम

ता. १५-४-१९३२.

काल रात्रौ सत्याग्रह कॅम्पमध्ये असंख्य लोकसमुदाय जमला होता, सत्याग्रह यशस्वी करण्याकरितां मे. भाऊराव गायकवाड, दाणी, रणखांबे व पतितपावनदास यांचीं स्फुलिदायक भाषणें झाली.

आज सकाळीं मंदिरप्रवेश सत्याग्रहाबाबत सारखी चुरस लागून गेली

होती. पहिल्या तुकडीमध्यें जाण्याची स्त्री व पुरुष सैनिकांची चुरस विशेष