७८
अस्पृश्यांचे धर्मातर आणि त्यांचे राजकीय हक्क
अस्पृश्यांनी धर्मांतर केले तर त्यांना १९३५ च्या कायद्यान्वये जे राजकीय हक्क देण्यात आलेले आहेत त्यांचा त्यांना उपभोग घेण्याचा हक्क राहतो किंवा नाही, हा मोठा वादग्रस्त प्रश्न होता. धर्मांतराची घोषणा करण्याअगोदर या प्रश्नाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व बाजूंनी विचार केलेला होता. हा प्रश्न स्पृश्य आणि अस्पृश्य लोक सभांतून व वर्तमानपत्रांतून वेळोदेळी उपरिथित करीत असत. तेव्हा काही वेळा साहेब त्यांना त्रोटकपणे उत्तरे देत व अस्पृश्यांनी धर्मातर केले तरी त्यांना अस्पृश्य म्हणून जे राजकीय हक्क मिळालेत ते त्यांना धर्मातरानेतरही उपभोगावयास मिळतील असे आपले मत प्रदर्शित करीत असत. या बाबतीत जे साशंक होते, त्यांची शंकानिवृत्ती व्हावी या हेतूने त्यांनी ' जनते ' च्या २५ जुलै आणि १ ऑगस्ट १९३६ च्या जोडअंकात उपरोक्त शीर्षकाचा अग्रलेख लिहिला तो असा :--
अस्पृश्य वर्गाने हिंदुधर्माचा त्याग करून परधर्माचा अंगीकार करण्याचा आपला मनोदय व्यक्त केल्यापासून हिंदू लोकांत मोठीच खळबळ उडून गेलेली आहे. धर्मांतराच्या चळवळीला शह देण्यासाठी हिंदू लोक शिकस्तीचे प्रयत्न करीत आहे. शह देण्याकरिता ते ज्या मार्गाचा अवलंब करीत आहे, ते मार्ग न्यायान्यायाची चाड असणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला शिष्टसंमत होणार नाहीत, अशी आमची खात्री आहे. ज्या ज्या वेळी अस्पृश्यांनी स्वाभिमान संरक्षणासाठी स्वतंत्रतेच्या मार्गावर पाऊल ठेवून आपली प्रगती करून घेण्याचा निर्धार जाहीर केला त्या त्या वेळी हिंदूंनी जातिहिताच्या व श्रेष्ठतेच्या भावनांना बळी पडून अस्पृश्यांना जरब बसविण्यासाठी पूर्वीपासून ज्या शस्त्रांचा उपयोग ते करीत आले आहेत ती शस्त्रे अस्पृश्यांच्या धर्मांतराच्या घोषणेलाही विरोध करण्याकरिता उपयोगात आणण्याचा उपक्रम त्यांनी चालू केला आहे. हिंदू जमीनदार अस्पृश्य कुळांकडील जमिनी काढून घेत आहेत. तसेच हिंदू जनता अस्पृश्यांवर सामाजिक व आर्थिक बहिष्कार पुकारीत आहेत. परंतु अस्पृश्यांना गुलामगिरीत डांबून ठेवण्यासाठी योजिलेल्या या जुन्या पुराण्या उपायांचा काहीच उपयोग होत नसून अस्पृश्यवर्गाची धर्मांतराची चळवळ अप्रतिहतपणे सर्वत्र पसरत चाललेली