202 डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
होतील असा जो विश्वास वाटत होता तो नष्ट झाला आहे. इतका की ज्या ज्या लोकांनी पहिल्या दिवशी अस्पृश्यांना भेडसावून सोडणारे अग्रलेख लिहिले त्या त्या लोकांनी दुसऱ्या दिवशी जीभ चावून आपले चुकले म्हणून उलट अग्रलेख लिहिले व डॉ. आंबेडकरांनी केलेला अर्थ व मांडलेली विचारसरणी बरोबर व कायदेशीर आहे, अशी कबुली दिली.
धर्मातराने राजकीय हक्कांस बाध. येतो की काय या प्रश्नासंबंधाने डॉ. आंबेडकरांनी महार परिषदेत केलेल्या भाषणात त्यांनी त्या प्रश्नाची चर्चा सविस्तर केलेली होती. ' जनते ' च्या वाचकांनी ते भाषण वाचलेले असल्यामुळे फिरून त्या प्रश्नाची चर्चा ' जनते ' त करण्याची आवश्यकता नव्हती. परंतु हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे आणि अस्पृश्य समाज नवीन राजकीय घटनेच्या बाबतीत ज्ञानहीन असल्यामुळे त्याची या बाबतीत दिशाभूल करणे कोणालाही शक्य होऊ नये म्हणून या विषयाची पुन्हा एकदा चर्चा करणे प्राप्त झाले आहे. गेल्या आठवड्यात हिंदू विरोधकांनी जी वावटळ उठविली होती व तीत जे अनेक मुद्दे मांडले होते, त्यांतील पहिला मुद्दा जो प्रामुख्याने मांडला गेला होता तो हा की, अस्पृश्य लोकांनी हिंदूधर्माचा त्याग करण्याचा व हिंदू देवतांना व ग्रंथांना न मानण्याचा जो ठराव पास केला त्यामुळे त्यांना दिलेल्या राजकीय हक्कांचा उपभोग घेण्यास ते कायद्याने अपात्र ठरले आहेत. याचा स्पष्ट अर्थ असा की, अस्पृश्य लोकांना नवीन राजकीयघटनेत जे राजकीय हक्क देण्यांत आलेले आहेत त्याचा जर उपभोग घ्यावयाचा असेल तर त्यांना हिंदू म्हणूनच राहिले पाहिजे. आपण हिंदू नाही असे ते जर म्हणतील तर ते आपल्या राजकीय हक्काला मुकतील. जसा कोळी आपले जाळे लांबवर पसरून त्यात ओहोळातील मासे अडकवून धरण्याचा प्रयत्न करतो, तसाच हिंदुत्वाचा अस्पृश्यांभोवती पाश पसरून त्यांना आपल्या जाळ्यात अडकविण्याचा हिंदूंचा हेतू असेल तर तो या डावाने साध्य होऊ शकणार नाही. कारण हा डाव सफल होण्यास आधी हिंदू कोणाला म्हणावे याची काहीतरी ठराविक कायदेशीर व्याख्या असावयास पाहिजे. पण हिंदू या शब्दाची सर्वसामान्य व्याख्या आजवर कोणीही दिलेली नाही व कोणत्याही कायद्यात ठेवण्याचा प्रयत्नही केलेला नाही. हिंदूधर्माची व्याख्या करणे इतके कठीण आहे की, जो कोणत्याच धर्माचा अनुयायी नाही तो हिंदूधर्माचा अनुयायी, अशी व्याख्या एक तज्ज्ञ माणसाने तयार केलेली आमच्या वाचनात आहे. खुद्द हिंदूमहासभेने. देखील हिंदुस्थानात उत्पन्न झालेल्या कोणत्याही धर्माचे पालन करणारा तो हिंदू अशी हिदू या शब्दाची व्याख्या केलेली आहे व हिंदू या शब्दात सनातनी, आर्यसमाज, जैन, शीख, बौद्ध व ब्राह्मो