२०४ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
क्लासेस असे व्याख्येत म्हटलेले नाही. तसेच ज्या जातींचा समावेश लिस्टात करून त्यांना शेड्यूल्ड कास्टमध्ये टाकण्यात आले आहे, त्यांचा उल्लेख करताना हिंदूंपेकी अमूक अमूक जाती असे विशेषणात्मक वचन लावलेले नाही. हे परिशिष्ट १, कलम २६ यात शेड्यूल्ड कास्टच्या व्याख्येवरून उघड होत आहे. इतकेच नव्हे तर शेड्यूल्ड कास्टच्या बाबतीत जी सार्वभौम बादशहाची ऑर्डर इन कौन्सिल प्रसिद्ध झाली आहे त्यात शेड्यूल्ड कास्टमध्ये प्रांतोप्रांती कोणकोणत्या जातींचा समावेश करावयाचा याची जी यादी देण्यात आंलेली आहे त्यातही हिंदूंतील अमूक अमूक जाती असे विशेषणात्मक वचन घातले नाही. नुसता जातींचा उल्लेख केलेला आहे. या व्याख्येवरून स्पष्ट आहे की, राजकीय हक्काकरिता हिंदू समाजात किंवा हिंदुधर्मात राहिले पाहिजे अशी अट कायद्याने घातलेली नाही आणि म्हणून जे लोक असे म्हणतात की, हिंदू धर्मातर्गत किंवा हिंदू समाजांतर्गत जातींनाच हे राजकीय हक्क दिले आहेत, ते त्या जाती हिंदूधर्माचा त्याग करतील तर त्यांना राजकीय हक्कांना मुकावे लागेल, त्या लोकांचे म्हणणे या एका व्याख्येच्या विवेचनावरून कसे निखालस खोटे आहे हे कोणासही कळून येईल.
अस्पृश्यांच्या राजकीय हक्कांच्या बाबतीत हिंदुधर्मत्यागाच्या ठरावाचा काही विघातक परिणाम होऊ शकत नाही. याला दुसरीही कारणे देता येतील व ही कारणे सुलभ रीतीने जनतेच्या वाचकांना समजावी म्हणून ती देण्यापूर्वी जातवार प्रतिनिधित्वाच्या कायद्याने ठरविलेल्या पद्धतीची रुपरेषा काय आहे हे आधी सांगितले पाहिजे. म्हणून या विषयाची मांडणी प्रथम आम्ही करण्याचे योजिले आहे. हिंदुस्थानातील लोक भिन्न भिन्न धर्माचे अनुयायी आहेत. उदाहरणार्थ हिंदू, जेन, बौद्ध, पार्शी, मुसलमान वगैरे लोक त्या त्या धर्माचे अनुयायी आहेत. त्याच प्रमाणे कित्येक लोक नास्तिक असून कोणत्याच धर्माला मानीत नाहीत. या सर्व लोकांचा मिळून हिंदुस्थानामध्ये सामान्य जनसमूह बनलेला आहे. या सामान्य जनसमूहाचा जो मतदार संघ घडविण्यात आला आहे त्यालाच कायद्याने सामान्य मतदार संघ असे नाव देण्यात आले आहे. जातवार प्रतिनिधीचे तत्त्व जर हिंदुस्थानात आले नसते तर एकाच मतदारसंघात सर्व धर्माच्या लोकांचा तसेच निधर्मी लोकांचाही समावेश झाला असता. म्हणजे सामान्य मतदार संघाला धर्माचा कोणत्याही प्रकारचा विधिनिषेध झाला नसता. परंतु जातवार प्रतिनिधित्वाचे तत्त्व मान्य झाल्यामुळे जातीय निवाड्याने पहिली जी गोष्ट केली ती ही की, सामान्य मतदारसंघातून काही विशिष्ट धर्माचे. लोक निवडून काढून त्यांचे स्वतंत्र मतदारसंघ घडविण्याचे ठरविले. त्याप्रमाणे जातीय निवाड्याने तीन धर्मांच्या लोकांना सामान्य मतदारसंघातून बाहेर काढून