अस्पृश्यांचे धर्मातर आणि त्यांचे राजकीय हक्क - Page 248

२०६ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

समावेश सर्व सामान्य मतदार संघात करण्यात आलेला आहे, ही गोष्ट ध्यानात घेतली आणि वर दर्शविल्याप्रमाणे सामान्य मतदार संघात धर्माधर्माचा आणि मतदाराच्या पात्रापात्रतेचा कोणत्याही प्रकारचा संबंध नाही. या दोन गोष्टी जमेस घेतल्या म्हणजे अस्पृश्य वर्गाला जे राजकीय हक्क दिले आहेत ते हक्क त्यांनी हिंदुधर्माचा त्याग केल्याचा निश्चय जाहीर केल्यामुळे हिरावले जातील, असे म्हणणें कोणालाही शक्य होणार नाही. कारण ते हक्क धर्मावलंबी नाहीत. ज्या अस्पृश्य लोकांनी हिंदू धर्माचा त्याग करण्याचा निश्चय जाहीर केला आहे परंतु ज्यांनी अजून दुसरा धर्म स्वीकारला नाही त्या लोकांना फार तर निधर्मी म्हणता येईल. परंतु निधर्मी लोकांचा समावेश सामान्य मतदार संघात करता येणार नाही असे कायद्याचे अल्पस्वल्प ज्ञान असणारा कोणीही माणूस म्हणू शकणार नाही.

ज्या लोकांनी हा बागुलबोवा अस्पृश्यांपुढे उभा केला आहे त्या लोकांचा असा समज आहे की, अस्पृश्य वर्गाला देण्यात आलेल्या जागा हिंदू लोकांच्या वाट्यास आलेल्या जागांमधून दिलेल्या आहेत. परंतु आमच्या मते हा त्यांचा केवळ भ्रम आहे. कारण हिंदुजातीला कायद्याने ठराविक अशा जागा कोणत्याच प्रांतात दिलेल्या नाहीत. मुसलमान, खिश्चन, शीख इत्यादी मतदार संघांना ठरवून दिलेल्या जागासोडून ज्या शेष जागा राहिल्या त्या मुसलमान, खिश्चन, शीख यांना वगळून जी बाकीची जनता राहिली व जिचा सर्वसाधारण मतदारसंघात समावेश करण्यात आलेला आहे, त्या सामान्य जनतेला मिळून म्हणून देण्यात आलेल्या आहेत आणि अस्पृश्यांना देण्यात आलेल्या जागा या सामान्य जनतेला देण्यात आलेल्या जागांपैकी राखीव असलेला भाग असल्यामुळे केवळ हिंदू लोकांच्या वाट्यास आलेल्या जागांपैकी काही जागा अस्पृश्य लोकांना देण्यात आल्या, या म्हणण्याला काहीच आधार नाही. कारण ज्या सर्वसाधारण मतदार संघाच्या वाट्यातून अस्पृश्य वर्गाकरिता काही भाग राखून ठेवलेला आहे त्या सर्वसाधारण मतदार संघात हिंदूप्रमाणे जैन, बौद्ध, पारशी, यहुदी, नास्तिक वगैरे हिंद्वेतरांचा समावेश झालेला आहे. मुळातच हिंदूंच्या जागा नाहीत असे ठरल्यानंतर हिंदूंनी आपल्या वाटणीपैकी काही भाग अस्पृश्यांना ते हिंदू आहेत म्हणून व हिंदू राहतील असे समजून दिल्या, असे म्हणावयास काही आधार नाही.

येथपर्यंत आमच्या मताच्या समर्थनार्थ आम्ही तीन कारणे दिली आहेत. पहिले कारण असे की, शेड्यूल्ड कास्ट याची व्याख्या देताना हिंदू धर्मातर्गत जाती असा उल्लेख कायद्यात कोठेच केलेला नाही. दुसरे कारण असे की, ज्या सर्वसाधारण मतदार संघामध्ये अस्पृश्यांचा समावेश करण्यात आलेला आहे, त्या सर्वसाधारण