अस्पृश्यांचे धर्मातर आणि त्यांचे राजकीय हक्क - Page 249

अरपृश्यांचे धर्मातर आणि त्यांचे राजकीय हक्‍क २०७

मतदार संघामध्ये दाखल होण्यास ज्या अटी कायद्याने घातल्या आहेत त्यांत हिंदुधर्माचे अनुयायित्व नव्हे तर कोणत्याही धर्माच्या अनुयायित्वाची आवश्यकता सांगितलेली नाही व तिसरे कारण असे की, अस्पृश्य वर्गाला ज्या जागा देण्यात आलेल्या आहेत त्या हिंदूंच्या वाट्यातून दिलेल्या नसून सर्वसाधारण जनतेच्या वाट्यातून दिलेल्या आहेत. परंतु हिंदू लोकांनी शेड्यूल्ड कास्टच्या लिस्टात समाविष्ट झालेल्या जातींना राखून ठेवलेल्या जागांचा फायदा घेण्याकरिता हिंदू धर्मातच राहिले पाहिजे, असा जो प्रश्‍न उपस्थित केलां आहे, त्याला आम्ही नकारार्थी उत्तर दिले आहे. त्याला आणखी चौथे कारण देता येण्यासारखे आहे. शेड्यूल्ड कास्टच्या लिस्टात समावेश केलेल्या जातींनी हिंदू धर्माशी एकनिष्ठ राहिले तरच त्यांना राखीव जागांचा फायदा घेता येईल असे जे म्हणतात त्यांनी एका महत्त्वाच्या गोष्टीकडे दुर्लक्ष केले असावे असे आम्हांस वाटते. आमच्या मते या जातींतील लोकांना राखीव जागेचा जो फायदा देण्यात आलेला आहे तो त्या जातींतील मतदारांच्या धार्मिक निष्ठेवर नसून मतदारांच्या जातित्वावरच आधारलेला आहे. जातीय निवाड्याने सामान्य मतदार संघात जे वर्ग किंवा ज्या जाती समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत त्यांपैकी काही विशिष्ट जाती निवडून काढून त्यांचा एक गट बनविला आहे आणि त्या गटाला शेड्यूल्ड कास्ट असे नाव देऊन त्या गटासाठी सामान्य मतदार संघाच्या वाट्यास आलेल्या जागांपैकी काही ठराविक जागा त्यांच्याकरिता राखून ठेविल्या आहेत. या राखीव जागेकरिता पात्रापात्रतेची कसोटी पाहावयाची झाल्यास ती जातीवरून पाहावयाची आहे. धर्मावरून पाहावयाची नाही. राखीव जागेकरिता अस्पृश्य उमेदवाराची पात्रता ठरवावयाची झाल्यास ती जातीवरून ठरवावयाची, धर्मावरून ठरवावयाची नाही. या आमच्या म्हणण्याची सत्यता खालील उदाहरणावरून स्पष्टपणे वाचकांच्या ध्यानात येईल.

पंजाबातील शेड्यूल्ड कास्टच्या लिस्टात आदधर्मीय लोकांचा व रामदासी लोकांचा समावेश करण्यात आलेला आहे. ही गोष्ट शेड्यूल्ड कास्टच्या बाबतीत जी सरकारी ऑर्डर-इन-कौन्सिल प्रसिद्ध झालेली आहे त्यावरून दिसून येईल. या आदधर्मीय लोकांचा इतिहास याठिकाणी अतिशय उद्बोधक होईल अशी आमची खात्री आहे. काही वर्षापूर्वी पंजाबातील चांभार व च्यूडा वगैरे अस्पृश्य जातींच्या लोकांनी आदधर्म मंडळ नावाची संस्था स्थापन केली होती. या संस्थेचा मूळ उद्देश हिंदू धर्माचा त्याग करणे असाच होता. सन १९३१ च्या खानेसुमारीचे वेळी या संस्थेने पंजाब सरकारकडे असा अर्ज केला होता की, आम्ही हिंदुधर्माचा त्याग केलेला आहे आणि म्हणून -खानेसुमारीत