अस्पृश्यांचे धर्मातर आणि त्यांचे राजकीय हक्क - Page 250

२०८ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

आम्हांला हिंदूंपासून निराळे करून सेन्सस रिपोर्टात आमची लोकसंख्या आदधर्मीय या नावाखाली स्वतंत्रपणे निराळी दाखविण्यात यावी. या मागणीमुळे पंजाबातील हिंदू लोक चिडून जाऊन त्यांनी पुष्कळ अत्याचार केले. परंतु या लोकांनी आपला निश्चय न सोडल्यामुळे आदधर्मीयांची चळवळ यशस्वी होऊन पंजाबच्या सेन्सस रिपोर्टात आदधर्मीयांची संख्या आदधर्मीय नावाखाली हिंदूंपासून निराळी दाखविण्यात आली आहे. रामदासी लोक हे शीख धर्माचे अनुयायी आहेत. अर्थातच ते हिंदू नाहीत. तथापि त्यांचा समावेश शेड्यूल्ड कास्टमध्ये करण्यात आलेला आहे. यावरील दोन उदाहरणावरून एकच निष्कर्ष निघू शकतो व तो हा की, शेड्यूल्ड कास्टच्या गटातील जातींना त्यांना दिलेले राजकीय इक्क उपभोगण्याकरिता ते पात्र आहेत किंवा अपात्र आहेत हे ठरविण्याकरिता ते हिंदू धर्माचे आहेत किंवा नाहीत हा प्रश्‍न निरर्थक आहे. उमेदवार या शेड्यूल्ड कास्टच्या लिस्टात समाविष्ट केलेल्या कोणत्या तरी एका जातीचा माणूस असला म्हणजे कायद्याच्या दृष्टीने बस्स आहे. तो त्यांच्याकरिता राखून ठेवलेल्या राजकीय हक्कास पात्र होऊ शकतो, अमूक एका धर्मावर निष्ठा असण्याची आवश्यकता नाही. म्हणजे हिंदू धर्माचा त्याग करून देखील त्यांना कायद्याने मिळालेल्या राजकीय हक्कांचा उपभोग घेता येईल.

परधर्मात गेल्याने काय होईल ?

अस्पृश्य वर्गाच्या हितशत्रूंनी जो प्रश्‍न उभा केला आहे तो खोडून टाकण्यासाठी याहून अधिक लिहिण्याची आवश्यकता आहे असे आम्हांस वाटत नाही. शेड्यूल्ड कास्टच्या लिस्टमधील काही जातींनी हिंदू धर्माचा त्याग केला इतकेच नव्हे तर दुसऱ्या एखाद्या धर्माचा अंगीकार केला तर त्यांच्या राजकीय हक्कांचे काय होईल याही प्रश्‍नाची वासलात आजच लावण्याचा आमचा इरादा आहे. अस्पृश्य वर्गाच्या प्रतिपक्षीयांनी या बाबतीत काही प्रख्यात हिंदू कायदे पंडितांचा सल्ला घेतल्याचे जाहीर झाले आहे. या हिंदू पंडितांनी शेड्यूल्ड कास्टच्या लिस्टमधील : जातींनी हिंदू धर्माचा त्याग करावा असे केवळ अभावात्मक धोरण ठरविले तर राजकीय हक्क हिरावून घेण्याला कायद्याच्या दृष्टीने ते कारण अपुरे पडेल असे मत दिले आहे. आम्हांला आनंद वाटतो की, कायदे पंडितांच्या या सल्ल्यामुळे अस्पृश्य वर्गाच्या हितशत्रूंच्या कुटील नीतीला बराच आळा बसेल. परंतु या हिंदू कायदे पंडितांनी अस्पृश्यांनी धर्मातर केले तर त्यांचे हक्क नष्ट होतील असे जे मत दिले आहे, त्याने आमचे समाधान होऊ शकत नाही. या हिंदू कायदे पंडितांच्या मतांत अतिव्याप्तीचा दोष आहे आणि म्हणून कायद्याच्या दृष्टीने ते अग्राह्य आहे, असे आम्हांला वाटते. आमच्या कायद्याच्या मते जातीय