अस्पृश्यांचे धर्मातर आणि त्यांचे राजकीय हक्क २०९
प्रतिनिधीत्वाच्या बाबतीत कायद्याने ठरवून दिलेल्या व्यवस्थेप्रमाणे अस्पृश्य वर्गाला सामान्य मतदार संघात असलेले राजकीय हक्क काही धर्म अंगीकारिल्याने निश्चितपणे नष्ट होतील हे खरे ; परंतु हा नियम सर्व धर्मास लागू होईल असे . नाही. आमच्या म्हणण्याचा स्पष्ट अर्थ असा की, अस्पृश्य वर्गाने सामान्य मतदार संघापासून विभक्त करण्यात आलेल्या एखाद्या धर्माचा अंगीकार केला तरच त्यांचे राजकीय हक्क नष्ट होतील. सामान्य मतदार संघातून वगळण्यात आलेला धर्म कोणता हे प्रत्येक इलाख्यात कायद्याने जी व्यवस्था ठरवून दिली असेल तिच्यावर अवलंबून आहे. इस्लाम आणि खिस्ती धर्म हिंदुस्थानातील सर्वच प्रांतांत सामान्य मतदार संघापासून वेगळे काढण्यात आलेले आहेत. परंतु शीख धर्म फक्त पंजाब प्रांतातच स्वतंत्र करण्यात आलेला आहे. याचा अर्थ असा की, अस्पृश्य लोक मुसलमान किंवा खिश्चन झाले तर हिंदुस्थानातील सर्वच प्रांतांत त्यांचे राजकीय हक्क नाहीसे होतील आणि शीख झाले तर फक्त पंजाब प्रांतातच ते नाहीसे होतील. अस्पृश्य वर्गाने बुद्ध, जैन, ज्यू आणि शीख-पंजाब प्रांतखेरीज करून-धर्माचा अंगीकार केला तर त्यांच्या राजकीय हक्कांना कोणत्याही प्रकारचा बाध येऊ शकणार नाही, ही गोष्ट निर्विवाद आहे. याला बंगाल प्रांत हा एकच अपवाद आहे. बंगाल प्रांतातील शेड्यूल्ड | कास्टच्या बाबतीत असा नियम करण्यात आला आहे की शेड्यूल्ड कास्टपैकी एखाद्या व्यक्तीने बुद्ध धर्माचा स्वीकार केला तर त्याची शेड्यूल्ड कास्टमध्ये गणना करता येणार नाही. म्हणजे त्याला.त्या गटाचे राजकीय हक्क उपभोगता येणार नाहीत हा नियम शेड्यूल्ड कास्ट ऑर्डर्स-इन-कौन्सिलमध्ये घालण्यात आलेला आहे. हा प्रतिबंध फक्त बौद्ध धर्मापुरता असून तो फक्त बंगालच्या अस्पृश्य लोकांनाच लागू आहे. |
या सर्व विवेचनाचा मतितार्थ आमच्या वाचकांना पूर्णपणे कळावा म्हणून धर्मांतराचा राजकीय हक्कांवर काय परिणाम होईल हे थोडक्यात सांगणे इष्ट आहे असे आम्हांस वाटते म्हणून आमच्या विवेचनाचे संकलन आम्ही खालील कलमांत देत आहोत.
(१) नुसता हिंदू धर्माचा. त्याग केल्याने व दुसरा कोणताही धर्म न
स्वीकारल्याने म्हणजे निधर्मी बनल्याने अस्पृश्यांचे राजकीय हक्क नष्ट होऊ
शकत नाहीत. हा नियम सर्व प्रांतांना लागू पडेल.
(२) हिंदुधर्माचा त्याग करून अस्पृश्य लोकांनी इस्लाम अगर ख्रिस्ती धर्म
स्वीकारला तर त्यांचे राजकीय हक्क हिरावले जातील. हा नियम सर्व
प्रांतांतील लोकांना लागू पडेल.