अस्पृश्यांचे धर्मातर आणि त्यांचे राजकीय हक्क - Page 254

292 डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

सहाय्याला धावले आणि आमचे न्याय्य हक्क संपादन करण्याला त्यांच्या सहाय्यानेच आम्ही समर्थ झालो. अस्पृश्य वर्गासंबंधी महात्मा गांधींनी केलेल्या लीला जगजाहीर झालेल्या आहेत. काँग्रेस आणि मुसलमान यांच्या संयुक्त

प्रयत्नाने अस्पृश्य वर्गाच्या मागण्या हाणून पाडण्यासाठी मुसलमानांना लाच देण्याचा जो कावा या महात्म्याने रचला होता त्याची हकिगत हिंदुस्थानच्या इतिहासात वाचीत असताना कोणाही हिंदी माणसाला लज्जेने मान खाली घालावी लागेल. महात्म्याने अस्पृश्य वर्गाचा जो विश्‍वासघात केला त्याला, जगाच्या इतिहासात कोठेही तुलनाच सापडणार नाही. आमची खात्री आहे की, काँग्रेस आणि अस्पृश्यवर्ग यांची पुरतेपणी ताटातूट करण्याला जर एखादी गोष्ट प्रामुख्याने कारणीभूत झाली असेल तर गोलमेज परिषदेच्या वेळी या महात्म्याने अस्पृश्यवर्गाचा केलेला विश्वासघात हीच होय. म्हणून अस्पृश्य वर्गाने हिंदू लोकांबद्दल कृतज्ञतेची भावना दाखविली नाही तर त्याबद्दल त्यांना आश्‍चर्य वाटण्याचे कारण नाही. अस्पृश्यता वाटण्यासारखे हिंदूंनी त्यांच्यासाठी काहीच केलेले नाही.

या विषयावर ता. २८ जुलैच्या अंकात ' केसरी'च्या संपादकाने "' धर्माचा विचित्र लिलाव “ या शीर्षकाखाली एक अग्रलेख लिहून आपल्या अकलेचे प्रदर्शन केले आहे. या अग्रलेखात जी हीन मनोवृत्ती व्यक्त करण्यात आलेली आहे व जो शिवराळपणा करण्यात आला आहे त्याच्याशी आम्हाला काही कर्तव्य नाही. स्वत:च्या मुलाला त्याच्या आईसमोर 'शिंदळीच्या' म्हणून संबोधण्यास ज्या जातीच्या लोकांना कवडीचीही खंत वाटत नाही त्या जातीपैकी एकाने परकोयासंबंधाने अयोग्य भाषा वापरली तर त्याबद्दल कोणास आश्‍चर्य का वाटावे ? 'कंसरी' च्या संपादकाने रचलेल्या तर्कटातील दोनच विधानांना आम्ही उत्तर देऊ इच्छितो. कम्युनल अवार्ड मध्ये अस्पृश्यांकरिता अवघ्या एकाहत्तर जागा राखून ठेवल्या होत्या. त्याच्याऐवजी पुणे करारात अस्पृश्यांना १४८ जागा देण्यात आल्या. म्हणजे ७१ जागा अधिक देण्यात आल्या. हा मोठा स्वार्थत्याग आहे, असे 'केसरी' चा शहाणा संपादक सांगत सुटला आहे व अस्पृश्य लोक हिंदुंचे आभार मानीत नाहीत, म्हणून तो त्यांना कृतघ्न म्हणतो. या उडाणटप्पू संपादकाला असे सांगणे प्राप्त आहे की, कम्युनल अवार्डमध्ये फक्त ७१ जागा राखून ठेवल्या होत्या, जास्त काही दिले नव्हते, ही गोष्ट खोटी आहे. अस्पृश्य लोकांना कम्युनल अवार्डमध्ये नुसत्या ७१ जागा राखून ठेवल्या होत्या इतकेच नव्हे तर त्याच्याहीपेक्षा जास्त विस्तृत प्रकारचे राजकीय हक्क देण्यात आलेले होते. कम्युनल अवार्डमध्ये स्वतंत्र मतदार संघातर्फे ७१ जागा देण्यात आल्या होत्या एवढीच गोष्ट या निंदकाच्या ध्यानी राहिलेली दिसते. परंतु कम्युनल अवार्डमध्ये अस्पृश्यांकरिता स्वतंत्र मतदार संघातर्फे ७१ जागा राखून ठेवल्या होत्या व