अस्पृश्यांचे धर्मातर आणि त्यांचे राजकीय हक्क - Page 255

अस्पृश्यांचे धर्मातर आणि त्यांचे राजकीय हक्क २१३

त्याशिवाय त्यांना सार्वजनिक मतदारसंघात मत देण्याचा अधिकार देण्यात आलेला होता, ही गोष्ट पुष्कळसे हिंदुलोक विसरून गेलेले दिसतात. कम्युनल अवार्डमध्ये अस्पृश्य मतदाराला दोन मते देण्यात आलेली होती. एक त्यांच्या स्वतंत्र मतदार संघात त्यांचा प्रतिनिधी निवडून देण्याकरिता व दुसरे सर्वसाधारण मतदार संघात सर्वसाधारण उमेदवाराला निवडून देण्याकरिता. ही दोन मतांची सवलत हिंदुस्थानातील इतर कोणत्याही वर्गातील अगर धर्मातील लोकांना देण्यात आलेली नव्हती. पुणे-करारात सत्त्याहत्तर जागा अधिक देण्यात आल्या हे खरे. परंतु पुणे-करारात अस्पृश्यांचे दुय्यम मत काढून घेण्यात आले हेही तितकेच खरे आहे. या सौद्यात कोणाचा लाभ झाला. कोणाचे नुकसांन झाले हे तराजूत घालून कोणालाही नक्की सांगता येणार नाही. परंतु या सौद्यात फक्त अस्पृश्यांचा फायदा झाला व हिंदूंचे नुकसान झाले म्हणणाऱ्यांची गणती लुच्चे लोकांत किंवा निर्बुद्ध लोकांत केली पाहिजे. डॉ. आंबेडकरांनी मांडलेला हा धर्माचा लिलाव कसा विचित्र आहे हे दाखविण्याकरिता 'केसरी' च्या संपादकाने मोठ्या दिमाखाने म्हटले आहे की, शीख व बौद्ध झाल्याने अस्पृश्यतेचा डाग तर जावाच पण अस्पृश्य वर्गाच्या मतदार संघाकरिता राखून ठेवलेल्या जागा पटकाविण्याची सवलत मात्र आपल्या हातची जाऊ नये, अशी डॉ. आंबेडकरांची दुहेरी मागणी आहे. धर्मांतरापुढे राजकीय हक्कांची आपल्याला काही मातब्बरी नाही हे डॉ. आंबेडकर यांनी नुकत्याच भरलेल्या महार परिषदेत जे भाषण केले त्यात त्यांनी अगदी स्पष्टपणे जाहीर केले होते. परंतु 'केसरी' ने म्हटल्याप्रमाणे डॉ. आंबेडकरांना दोन्हीही गोष्टी साधावयाच्या आहेत, असे जरी-गृहीत धरले तरी त्यांत वेगळे असे काय आहे ? खिस्ती लोक अस्पृश्य नाहीत, तथापि हिंदूंनी त्यांना स्वतंत्र जागा राखून ठेवण्याचे बाबतीत कसलीच आडकाठी दाखविलेली नाही. मुसलमान लोक काही अस्पृश्य नाहीत. त्यांना त्यांच्या संख्येच्या अनेक पटीने जागा राखून ठेवल्या आहेत व त्यालाही 'केसरी' ने कधी हरकत घेतलेली नाही ! ख्रिस्ती लोक अस्पृश्य नसूनही राखीव जागेच्या सवलतीचा उपभोग घेतात. मुसलमान लोक अस्पृश्य नसूनही राखीव जागेच्या सवलतीचा उपभोग घेतात. मग अस्पृश्य लोकांनी अस्पृश्यतेचा डाग घालवून राखीव जागेची सवलत टिकवून धरणेचा जर प्रयत्न केला तर 'केसरी' चे पोट का दुखावे ? 'केसरीचे' वाचक ज्यांना हिंदु-संस्कृतीच्या रक्षणार्थ काळजी वाटत असेल, त्यांनी या पत्राच्या नादान संपादकास असा प्रश्‍न विचारावा की, अस्पृश्यांकरिता राखून ठेवलेल्या जागा ते ज्या धर्मात जातील त्या धर्माच्या लोकांना लाभणार असतील तर अस्पृश्य लोक शीख अगर बौद्ध होऊन त्या धर्मियांची भर झालेली बरी, का अस्पृश्य लोक मुसलमान व खिस्ती होऊन मुसलमान व खिस्ती लोकांची धन झालेली बरी ? कोणी तरी या जागांचा अपहार करणार असेल तर, तो शीख किंवा बौद्ध यांनी केलेला बरा, का मुसलमान किंवा खिस्ती यांनी केलेला बरा ?