२१४ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
राखीव जागेच्या बाबतीत हिंदू लोकांच्या मनात जो एक भ्रम उत्पन्न झाला आहे त्याचे आम्ही निरसन करू इच्छितो. धर्मांतरामुळे अस्पृश्य वर्गाला मिळालेल्या जागा त्याच्या हातून जातील अशी धमकी देणे किंवा अस्पृश्यांना धर्मांतराचा प्रयत्न यशस्वी झाल्यास त्यांनी गमावलेल्या जागा आपल्या पदरात पडतील अशी आशा करणे या दोन्ही गोष्टी अगदी निष्फळ आहेत हे हिंदु लोकांनी विसरू नये. आम्ही वर सांगितलेच आहे की, अस्पृश्य वर्गाने खिश्चन किंवा मुसलमान धर्माचा स्वीकार केला तर त्यांचे राजकीय हक्क नष्ट होतील. परंतु दुसऱ्या एखाद्या कोणत्या तरी धर्माचा जर त्यांनी अंगीकार केला तर त्यांच्या कोणत्याही हक्काला बाध येणार नाही. परंतु महत्त्वाचा मुद्दा असा की, अस्पृश्य वर्गाने खिश्चन किंवा मुसलमान धर्माचा स्वीकार केला तर शेड्युल्ड कास्टच्या गटातींल जाती म्हणून त्यांचे जे हकक असतील त्यांना ते जरी मुकले तरी खिस्ती किंवा मुसलमान लोकांना जे हक्क असतील ते त्यांना प्राप्त होतील. कारण ख्रिस्ती किंवा इस्लाम धर्मात प्रवेश केलेल्या नव्या लोकांना मुळच्या खिश्चन किंवा मुसलमान लोकांना कायद्याने जे हक्क दिलेले आहेत ते मिळू नयेत असे कोणालाही म्हणता येणार नाही आणि जर इस्लाम आणि खिश्चन धर्मात गेलेल्या नवीन लोकांना राजकीय हक्क देण्याची व्यवस्था करावयाची असेल तर सामान्य मतदार संघातील शेड्यूल्ड कास्टच्या गटाला मूळच्या ज्या जागा देण्यात आल्या असतील आणि ज्या त्यांच्या धर्मांतराच्या कारणाने रिकाम्या पडल्या असतील त्या जागा खिश्चन किंवा मुसलमान मतदार संघाला जातील. नव्हे खिस्ती व मुसलमान लोक आपली लोकसंख्या वाढली म्हणून हिंदूंच्या उरावर बसून त्या जागा घेतील
प्रत्येक हिंदुमात्राने हे ध्यानात ठेविले पाहिजे की, ज्या जागा आज अस्पृश्य वर्गाला देण्यात आलेल्या आहेत, त्यांची परतवणी कधीच होणार नाही व त्या हिंदू लोकांना कधीच मिळणे शक्य नाही. जमिनीबरोबर त्या जमिनीसंबंधीचे करारमदार ज्याप्रमाणे कायम असतात त्याचप्रमाणे अस्पृश्य जातीला ह्या मिळालेल्या जागा जातीय प्रतिनिधित्व अस्तित्वात असेपर्यंत त्या जातीच्याच ताब्यात राहातील. ते जिकडे जातील तिकडे त्यांच्या मागे त्या जातील म्हणून अस्पृश्य हिंदूंनी अस्पृश्यांच्या राजकीय हक्कांच्या बाबतीत जे धोरण स्वीकारले आहे ते अगदीच निर्बुद्धपणाचे आहे. धर्मांतराच्या चळवळीला थोपवून धरण्याला हिंदू लोकांच्या या धोरणाचा काहीच उपयोग होणार नाही. त्या धोरणाने अस्पृश्य वगाला मिळालेल्या जागा त्यांच्या हाती लागू शकणार नाहीत. त्यांच्या या धोरणाचा एकच निश्चित परिणाम होईल तो असा की, गुलामाच्या मनात आपल्या धन्यासंबंधाने जी तिरस्कार आणि संतापाची भावना वसत असते तशाच प्रकारची भावना हिंदुलोकासंबंधाने अस्पृश्यांच्याही मनात उत्पन्न होईल.