अस्पृश्यांचे धर्मातर आणि त्यांचे राजकीय हक्क २१५
अस्पृश्य वर्गाने हिंदू लोक आणि त्यांचा हिंदुधर्म यांचे बरोबर असलेला संबंध सर्वस्वी तोडावा असाच सल्ला आम्हो अस्पृश्य वर्गाला दिलेला आहे. हिंदू लोकांचे व त्याचप्रमाणे त्यांच्याबरोबर ज्या जातींचे राजकीय भवितव्य निगडित झाले आहे, त्यांचे कल्याण व्हावे म्हणून त्यांनी कोणते धोरण ठेवणे इष्ट होईल हे सांगण्याची जबाबदारी आमच्यावर येऊ शकत नाही. - परंतु या बाबतीत हिंदू लोकांच्या हातून इतकी अक्षम्य चूक घडत आहे की, त्यांनी आपले -मार्ग बदलले नाहीत तर त्यांच्या सर्वस्वाचा नाश झाल्याशिवाय रहाणार नाही. अशी आम्हाला भीती वाटते. केवळ या भावनेमुळेच आम्हांला हिंदुलोकांना दोन उपदेशाचे शब्द सांगावेसे वाटतात आणि ते त्याचा शांत चित्ताने व निर्विकल्प मनाने विचार करतील अशी आम्ही आशा बाळगतो. सामाजिक जीवन अविरोध आणि सुरक्षितपणे चालण्यासाठी एक मूलभूत तत्त्व सर्वमान्य झाले पाहिजे. ते तत्त्व हे की ज्यांच्याजवळ माया आहे त्यांनी ती ज्यांच्याजवळ नाही त्यांच्याबरोबर राहून खाण्यास शिकले पाहिजे. पुरातन काळापासून जगाच्या इतिहासात ज्या अनेक 'बंडाळ्या घडून आल्या त्यांचा विचार केल्यास असे आढळून येईल की, जेव्हा जेव्हा समाजातील सत्ताधारी लोकांनी आपल्या हाती असलेली सत्ता आणि अधिकार यांची सत्ताहीनांबरोबर वाटणी करण्याचे नाकारले, त्या त्या वेळी क्रांती घडून. आली. क्रांतीचा मार्ग रोखून धरण्याचा फक्त एकच उपाय आहे आणि तो म्हणजे समाजात सत्ता आणि अधिकार यांची योग्य प्रकारे वाटणी करणे हा होय.
युरोप खंडातील कांही देशांत ज्याप्रमाणे क्रांत्या घडून आल्या त्याप्रमाणे इंग्लंड देशात क्रांती घडून आली नाही. युरोपमधील वरिष्ठ सत्ताधारी वर्ग (ARISTOCRACY) नाश पावला. परंतु इंग्लंडमधील वरिष्ठ सत्ताधारी वर्ग (ARISTOCRACY) अद्याप जिवंत आहे. याचे कारण इतकेच की, इंग्लंडमधील वरिष्ठ सत्ताधारी वर्गाला आपल्या हाती असलेली सत्ता आणि संपत्तीची वाटणी केली पाहिजे, हे माहीत आहे आणि त्याप्रमाणे तो वर्ग ती वाटणी करीत असतो आमच्या हिंदुमित्रांना आम्हांला एवढीच सूचना द्यावयाची आहे की, भूतकाळात सत्ताधारी वर्गांनी केवळ स्वार्थ बुद्धीला बळी पडून सत्ता आणि संपत्तीचा सारा वाटा आंपल्याच पदरांत पाडून घेण्याची अभिलाषा धरली व शेवटी आपल्या सर्वस्वाचा नाश करून घेतला. तीच गत हिंदूंची झाल्याशिवाय राहणार नाही. (जनता जोड अंक, २५ जुलै व १ ऑगष्ट १९३६, पा. ९-१२)
७७७
अग्रलेख : जनता, ता. २५ जुले व १ ऑगष्ट १९३६.
उद्घृत, खैरमोडे, खंड ७ वा, पृ. ३३-४९.