गाँधी महात्मा आहेत काय ? - Page 270

८१
गांधी महात्मा आहेत काय ?

ह्या प्रश्‍नाचा मला तीट येत आहे. याची कारणे दोन एक, मी सर्वच महात्म्यांचा द्वेष्टा आहे आणि एकजात सर्व महात्म्यांना निकालांत काढावें असें माझें मत आहे. त्यांचें अस्तित्व हा कोणत्याहि राष्ट्राला शाप आहे, कारण ते बुद्धि आणि बुद्धिवाद यांच्या जागी अंधश्रद्धेची प्रतिष्ठापना करूं पहातात. दुसरें म्हणजे महात्मा या शब्दाचा नक्की अर्थ लोक काय करतात हें मला माहित नाही. आणि म्हणून या प्रश्नाचें उत्तर देणें अशक्य आहे. तरी पण “चित्रे “ चे संपादक या प्रश्‍नाच्या उत्तरासाठी धरणें धरून बसल्यामुळें मी तें देण्याचा आटोकाट प्रयत्न करीत आहे.

सर्वसाधारण हिंदू माणसाच्या दृष्टीनें कोणत्याहि महात्म्याच्या ठिकाणीं तीन गोष्टींची आवश्यकता असते; त्याचे कपडे, त्याचें शील आणि त्याची शिकवण. त्यांपैकी कपडे हीच जर महात्म्याची कसोटी मानली तर, स्वत:च्या मोक्षासाठी दुसऱ्याच्या तोंडाकडे पाहणाऱ्या अडाण्यांच्या मतें कदाचित मोहनदास गांधी महात्मा ठरतील. वेश बदलून महात्मा बनणें हिंदुस्थानांत फार सोपें आहे. सामान्य रीतीनें जीवन -कंठणाऱ्या सामान्य मनुष्यानें कोणतेंहि चांगले कृत्य केलें तरी त्याच्याबद्दल हिंदुमात्राला कांहीं आदर असा वाटत नाही. पण तोच सामान्य मनुष्य कांही एक चांगले न करतां जर असामान्य म्हणजे विचित्र त-हेने वागू लागला तर तेवढ्याच कारणांमुळे तो संत बनतो, महात्मा बनतो, द्रष्टा बनतो. सुटाबुटाचा किंवा कोटधोतराचा साधा पोशाख करा, तुमच्याकडे लोक ढुंकूनहि पहाणार नाहींत. पण तेंच दिगंबर बना, जटा वाढवा, गटारांतलें पाणी प्या, लोक तुमच्या पायावर लोळण घेऊं लागतील. मग हिंदुस्थानांत गांधी “ महात्मा बनले यात काय नवल ? दुसऱ्या कोणत्याहि देशांत अशा महात्म्यांना दुःसह दिवाणा म्हणून लोकांनी त्यांची रेवडी उडविली असती |

गांधींची शिकवण पाहिली तर ती दिसायला मोठी गोंडस आहे. सत्य आणि अहिंसा ही उदात्त तत्वें आहेत, आणि गांधी त्यांचा जयघोष आधुनिक जगाला अपूर्व अशा गाजावाजीनें करीत आहेत. या तत्वांचा ते उच्चार करतात एवढ्याच साठी हिंदुझुंडींनीं त्यांच्या मागें कां धांवावें हें एक मला अद्याप न उलगडलेलें कोडे