238 डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
अप्रामाणिकपणाचा विरोध आहे ' या आरोपासंबंधाने काही गोष्टी कामगारांच्या निदर्शनास आणणे प्राप्त आहे. प्रथम हा आरोप कोणाला लागू पडतो, याचा मजूरांनी बारकाईने तपास करणे अवश्य आहे. संप कायद्याच्या बाबतीत कामगारांच्या वतीने जे पुढारी भांडत आहेत त्यांच्या आज तरी दोन तुकड्या आहेत, हे सर्व कामगारांनी ध्यानात ठेवावयास पाहिजे आहे. एक तुकडी ट्रेड युनियन काँग्रेसमध्ये सामील असलेल्या मजूर पुढाऱ्यांची व दुसरी स्वतंत्र मजूर पक्षाशी संलग्न असलेल्या मजूर पुढाऱ्यांची. चंचलतेचा, धरसोडीचा हा आरोप कोणत्याही इतर मजूरांच्या पुढाऱ्यांवर करणे वाजवी असो किंवा गैरवाजवी असो-तो मजूरांच्या चळवळीचा मुख्य आधारस्तंभ होत असलेला जो स्वतंत्र मजूर पक्ष त्याच्यावर अगर त्याच्या कोणत्याही कार्यकर्त्यावर करता येणार नाही, असे आम्ही स्पष्टपणे सांगू इच्छितो. या बाबतीत स्वतंत्र मजूर पक्षाची भूमिका धुतल्या तांदळासारखी स्वच्छ आहे. त्याच्यावर कोणालाही आपली बाजू बदलल्याचा आरोप केव्हाही करता येणार नाही. स्वतंत्र मजूर पक्षाला हे बील कधीही मान्य झाले नव्हते. आणि म्हणून त्या पक्षाचा विरोध अप्रामाणिक आहे, असे कोणालाही म्हणता येणार नाही.
मजूरांच्या इतर पुढाऱ्यांना अर्थात जे काही सांगावयाचे असेल, ते सांगण्यास ते समर्थ आहेत. त्यांची वकीली करण्याची आम्हास काही आवंश्यकता नाही. परंतु कोणाच्याही पापाने सार्वजनिक कार्याला विघातक होणे अनुचित असल्याकारणाने त्यासंबंधानेसुद्धा खुलासा करणे क्रमप्राप्त आहे. ज्या लोकांनी हे पत्रक काढून मजूरांच्या पुढाऱ्यासंबंधाने गैरसमज पसरविण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या लोकांना एक सवाल विचारणे आवश्यक आहे.
ट्रेड युनियन काँग्रेसमध्ये सामील असलेल्या मजूर पुढाऱ्यांनी पाठिंबा दिला असे जे म्हणतात त्यांनी तो पाठिंबा कोणत्या तत्त्वांना (धरून) दिला याचा खुलासा करणे जरूर आहे.
पाठिबा दिला, अशाप्रकारच्या भरमसाट कल्पना करून स्वतःचा गैरसमज करून घेणे व लोकांची दिशाभूल करणे यात काही अर्थ नाही. या बिलाच्या मुळाशी एकंदर पाच तत्त्वे आहेत. (१) सक्तीची तडजोड. (२) सक्तीचा लवाद, (३) संप हा गुन्हा व त्याकरिता शिक्षा, (४) कामगार संघ स्थापण्यास मालकाची मान्यता आणि (५) सरकार सांगेल त्याच युनियन्सना कामगारांचे प्रतिनिधी होण्याचा हक्क. या पाच तत्त्वांपैकी कोणत्या तत्त्वाला ट्रेड युनियन कॉग्रेसमध्ये सामील असलेल्या कामगार पुढाऱ्यांनी मान्यता दिली आहे, याचा