स्वतंत्र मजूर पक्षाचे युद्धविषयक धोरण ना वबा - Page 288

२४६ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

हिंदी लोकांना सक्तीचे शिक्षण देत नाहीत असा सार्वत्रिक समज आहे. लोकांच्या मनातील हा किंतू काढून टाकण्याचे प्रयत्न करावयास हवेत. - हिंदी लोकांनी आपणास मदत करावी, आपले संरक्षण करावे अशी ब्रिटनची इच्छा असल्यास त्याने हिंदी लोकांवर विश्वास ठेऊन त्यांना लष्करी शिक्षण देणे अगत्याचे आहे. विश्वासानेच विश्वास वाढतो, ही गोष्ट खरी आहे. हिंदुस्थानीय खड्या सैन्यातही युद्धास लायक व नालायक असा भेदभाव न करता सर्व जातीच्या लोकांचा शिरकाव झाला पाहिजे. अधिकाराची जागा हिंदी लोकांना देतांना पक्षपात न होता देण्याची व्यवस्था झाली पाहिजे. सध्या फक्त श्रीमंतासच लष्करी व नाविक शिक्षण घेता येते. श्रीमंत लोक अशा शिक्षणास पात्र असतात म्हणून त्यांना हे शिक्षण मिळते असे म्हणता येणार नाही. त्यांच्याजवळ पैसा असल्यामुळे त्यांना हे महागडे शिक्षण घेता येते, अशी वस्तुस्थिती आहे. ब्रिटीश सरकारला जनतेचा विश्‍वास संपादन करावयाचा असल्यास त्यांनी लष्करातील वरिष्ठ जागा काही फक्त श्रीमंतास व विशिष्ट जातीच्या लोकास देऊन एक वतनदार वर्ग निर्माण करण्याचे धोरण सोडून दिले पाहिजे.

ब्रिटिश साम्राज्यातील हिंदुस्थानचा दर्जा समानतेचा आहे. अशी हिंदुस्थानची खात्री करून देणे हे ब्रिटीश सरकारचे दुसरे कर्तव्य आहे. हिंदी राज्यघटनेच्या कायद्यात हिंदुस्थानला डोमिनिअन स्टेटस्‌ देणे हे ध्येय निर्दिष्ट करण्याचे टाळले असल्याने बऱ्याच लोकांना विषाद वाटत आहे. लॉर्ड अर्विन यांनी सन १९२९ मध्ये दिलेल्या आश्वासनास पार्लमेंटने १९३५ मध्ये हरताळ फासल्याने बऱ्याच लोकांचा ब्रिटीशावरील विश्वास डळमळू लागला आहे. याबाबतीतील हिंदी लोकांच्या शंका ताबडतोब दूर केल्या पाहिजेत. तत्त्वासाठी हिंदुस्थानने युद्ध करावयाचे तर युद्ध जिंकल्यानंतर या तत्त्वाचा फायदा हिंदुस्थानच्या पदरात पुरेपुर पडला पाहिजे.

वरील विवेचनावरून स्वतंत्र मजूर पक्षाचे धोरण स्पष्ट होते. व्हाईसरॉय साहेबाच्या ब्रिटनला मदत करण्यासाठी केलेल्या विनंतीवर दिलेली कारण परंपरा लक्षात घेऊन स्वतंत्र मजूर पक्षाचा पूर्ण पाठिंबा आहे. या आणीबाणीच्यावेळी मदत करण्यापूर्वी शर्ती घालणे योग्य होणार नाही, असे या पक्षाचे मत आहे. तरीपण ब्रिटीशांनी व हिंदी लोकांनी आपण एकत्र का लढत आहो व आपण परस्परापासून काय अपेक्षा करीत आहोत, याची जाणीव करून घेणे अगत्याचे आहे. असे स्वतंत्र मजूर पक्षाला वाटते.

XX)

जनता : १६ सप्टेंबर १९३९.