अस्पृश्यतेची कुळकथा - Page 290

२४८ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

अस्पृश्यतेच' उगम कसा झाला हे पाहण्यासाठी आपणास बुद्धधर्माच्या वाढीच्या इतिहासाकडे नजर फिरविली पाहिजे. हिंदुस्थानच्या इतिहासांत जेत्यानाही कधी न मिळलेले यश बुद्धधर्माला मिळाले. तो धर्म या देशांतील कानाकोपऱ्यांतही हां, हां म्हणता पसरला. थोड्यांच पिढ्यांत हिंदुस्थानातील शेतकरी व व्यापार उदीम करणाऱ्या जनतेने बुद्धधर्माचा स्वीकार केला.

ब्राह्मणी धर्माला या बुद्धधर्माच्या प्रचाराने भयंकर भीती वाटू लागली. ब्राह्मणांनी मोठ्या धूर्ततेनें आपणास प्रिय असणाऱ्या अशा आपल्या पुरातन सामाजिक व धार्मिक चाली झुगारून नव्या परिस्थितीशी जुळतें घेतलें नसते तर ब्राह्मणीधर्म खास रसातळास गेला असता. ब्राह्मणांच्या या संघिसाधु धोरणानेंच त्यांचा धर्म तगला हें उघड आहे.

ब्राह्मणानीं त्यावेळीं काय केलें तें आपण पाहू या. बुद्धधर्माची शिकवण मुख्यत्त्वे करून त्रिविध स्वरूपाची होती व तिने जनतेच्या मनाची पकड घेतली होती. बुद्धधर्मातील समतेची घोषणा, हिंसा व चातुर्वर्ण्य व यज्ञयाग यांचा निषेध, यांनी जनतेची मने आकर्षुन घेतली होती. ब्राह्मणी धर्माच्या यज्ञयागानें जनतेची नागवणूक होत असल्यामुळे तिला या धार्मिक उपाधींचा वीट आलेला होता.

याकालचे ब्राह्मण मुळींच शाकाहारी नसत. ते अगदी ' मटण मार्तङच ' असत. देवांच्या नावाने ते हजारो गाई व इतर पशू मारून आपली मांसाशनाची खाज ते धर्माच्या पांघरुणाखाली देवास नैवेद्य दाखवून भागवीत असत

या मांसाशनाच्या अतिरेकानें पशुहत्या होऊन शेतकऱ्यांची नागवणूक होत असे. यज्ञयागासाठी गाई त्या शेतकऱ्यांनाच पुरवाव्या लागत. ब्राह्मणांच्या या कसाब करणीने शेतकऱ्यांस आवश्यक असणारे दुधदुभते व त्यापासून उत्पन्न होणारे पदार्थ याचे दुभिक्ष्य पडून शेतकऱ्यांच्या सात्विक अन्नाचा झराच आटवून टाकण्यांत येत असे.

वेदांतील पशुयज्ञांची उघडी नागडी वर्णने वाचून, या अंगावर शहारे आणणाऱ्या अमानुष यज्ञयागांची हिडीस कल्पना, आजही करिता येण्याजोगी आहे. या ब्राह्मणी रानटीपणाची आजही प्रत्येक सभ्यमाणसास खंत येणारच व त्या जुन्याकाळच्या सभ्यांनाही तिचा तिटकारा वाटत असलाच पाहिजे.

बुद्धाचा अवतार झाल्यावर त्याने या यज्ञयागाविरुद्ध व हिंसेविरुद्ध बंड पुकारले. जनतेला आर्थिक व नैतिक दृष्ट्या बुद्धाची शिकवण तंतोतंत पटली व त्यांनी ब्राह्मणीधर्माला लाथ मारून बुद्धधर्माचा अंगिकार केला.