उकल करू पाहत्तात व या प्रश्नांचा गुंता सोडविण्यात ते सफलही होतात. हिंदूस्थानचे भवितव्य घडविण्यासाठी ते जीवाचा आटापिटा करतात. प्रस्थापित हिंदुधर्माला नकार दिल्याशिवाय येथील शोषितांची उन्नती होऊ शकत नाही, हे बाबासाहेबांनी अभ्यासान्ती ओळखले होते. त्यामुळेच ते हिंदुधर्माला नोटिसा ! देण्याची भाषा करतात. येथील प्रस्थापित संस्कृती भाकरी मागितली-दगड दिला या प्रकारची असल्यामुळे या संस्कृतीकडून दलित वर्गाच्या उत्थानाची अपेक्षाच करता येत नाही. नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही हा या जगाचा न्याय असल्यामुळे बाबासाहेब दलित वर्गाला नव्या संघर्षासाठी सज्ज करतात. “ ब्राह्मणेतर वर्गाने म. फुले यांची स्मृती पुसूनच टाकली, नव्हे त्यांच्या तत्त्वज्ञानास निर्लज्जपणे दगा दिला '' हे वास्तव त्यांच्या नजरेसमोर आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये अस्पृश्य समाजाचे तेजोभान जागृत करणे व त्यांना विद्रोही बनविणे बाबासाहेबांना अत्यावश्यक वाटते. अस्पृश्यवर्गाला ते स्वाभिमानाची ज्योत तेवत ठेवा ! असा सत्त्वपूर्ण संदेश देतात. आम्हाला स्वातंत्र्य पाहिजे ! त्याचबरोबर गुलामगिरीला आम्ही ठोकरीने उडवणार हा त्यांचा बाणा आहे. डॉ. बाबासाहेबांचे व्रत हे असे मूलभूत परिवर्तनाचे व क्रांतीचे आहे. अस्पृश्य समाज हा धार्मिक व राजकीय दृष्टीने स्वतंत्र व्हावा, या अभिलाषेने त्यांचे मन झपाटून गेले आहे. त्यामुळेच ते अस्पृश्यांचे धर्मातर आणि त्यांचे राजकीय हक्क या विषयाचा विचार स्वातंत्र्यप्राप्तीच्या कित्येक वर्षांपूर्वी करताना दिसतात. हिंदू धर्म म्हणजे गुलामगिरीचेच दुसरे नाव. असल्यामुळे बाबासाहेबांना धर्मत्याग करणे अपरिहार्य वाटत होते. त्यांच्या दृष्टीने धर्मांतर म्हणजे मूल्यांतर होते. हे धर्मातर समतातत्त्वाच्या प्रतिष्ठापनेकरिता त्यांना हवे होते. बुद्ध जयंती आणि तिचे राजकीय महत्त्व यासारख्या लेखामधून बाबासाहेबांच्या मनातील धर्मातरांचे संसूचन मौलिकपणे प्रगट होते. त्यांच्या लेखांचा प्रवास हा असा अस्पृश्यवर्गाच्या तसेच स्त्री-शूद्रादी वर्गाच्या बंधमुक्तीचा प्रवास आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे समग्र लेखन हे विचारप्रवर्तक आहें. या निबंधामधून ते विविध वादविषयांना व प्रश्नव्यूहांना सामोरे जातात आणि त्या घटकांतील सत्यासत्यता ते वाचकांसमोर मांडतात. बाबासाहेबांची सद्सद्विवेकबुद्धी मोठी विलक्षण व तत्त्वशुद्ध स्वरूपाची आहे. त्यांच्या सद्सदविवेकबुद्धीला न्याय्य हक्कांची व वैधानिकतेची किनार आहे. तर्कशुद्ध विचारसरणी व बिनतोड युक्तिवादाच्या आधारे ते विचारांचा आविष्कार करतात. आंबेडकरांच्या सत्यान्वेषी बुद्धीचे दर्शन या लेखनातील शब्दाशब्दांतून घडते. त्यांच्या विचारातील समतानिष्ठा मूल्यगर्भ आहे. समताप्रस्थापनेच्या मार्गाबद्दल त्यांना अचूक जाण आहे. समतेसाठीच ही विषमता या लेखामध्ये समतावाद्यांचे ध्येय त्यांनी सुंदरपणे
(सव्वीस)