MR/Khand_20 - Page 31

व्यक्त केले आहे. बाबासाहेब लिहितात, “ समतावाद्यांचे ध्येय सर्वांना समतेने वागविणे, हे नसून समता प्रस्थापित करणे हे आहे. हे ध्येय साधताना सर्वांना समतेने वागवून चालणे शक्य नाही. जेथे सर्व व्यक्ती समान आहेत, तेथे काही व्यक्तींना असमानतेने वागविल्यास विषमता उत्पन्न होईल. पण जेथे व्यक्ती असमान आहेत तेथे त्यांना सारख्या लेखून चालणे म्हणजे समता प्रस्थापनेच्या ध्येयाला विरोध करणे होय. या बाबतीत रोगी माणसाचे उदाहरण बरोबर लागू पडते. सुदृढ माणसाला जाडेभरडे अन्न चालते. पण सुदृढ माणूस व रोगी माणूस हे दोघेही सारखे मानून जर एखादा वेडगळ समतावादी ते जाडेभरडे अन्न रोग्याला देईल तर तो रोग्याला प्राणदाता होण्याऐवजी प्राणहर्ता होईल. त्याचप्रमाणे श्रीमंतावर जितका कर असतो, तितकाच गरिबावर ठेवावा, कारण तसे न केल्यास असमानता होईल, असे जर कोणी म्हणेल तर लोक त्याला वेड्यात काढतील, सारखा कर देण्याची ऐपत असलेल्या श्रीमंतांपैकी काहींवर कमी व काहींवर जास्त असा जर कर लादला किंवा सुदृढ माणसाला पचण्याजोगे अन्न पचविण्याची ज्यांच्यात ताकद आहे त्यांना रोग्याचे अन्न दिले तर मात्र विषमता होईल. या उदाहरणावरून तात्पर्य घ्यावयाचे ते हे की, समानांना असमानतेने व असमानांना समानतेने न वागविणे हा समतावाद्यांचा दस्तुर आहे. या दस्तुराने पाहिले असता डॉ. आंबेडकरांची मागणी त्यांच्या समतावादाला पूर्णपणे धरून आहे, हे कळून येणे सोपे आहे.” याप्रकारे बाबासाहेब समर्पक उदाहरणांच्या व बिनतोड़ युक्तिवादाच्या साहाय्याने सैद्धांतिक विचारांचा प्रभावीपणे अविष्कार करीत जातात.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे वैचारिक लेखन समाजरचनेमध्ये मूलभूत स्थित्यंतर घडविणारे आहे. संमाजातील स्थितीशीलतेचे रेखाटन करताना [ते ] न्यायनिष्ठूर व कर्तव्यकठोर स्वरूपाची भूमिका घेतात. बाबासाहेबांच्या या लेखनाची यथार्थता आजही आपणास प्रतीत होऊ शकते. धर्मतत्त्वांचा व समाजकारांचा मागोवा घेताना ते शास्त्रीयतेची व तर्कनिष्ठेची कास कधीही सोडीत नाहीत. त्यामुळेच त्यांचे सामाजिक व धार्मिक प्रश्‍नांसंबंधीचे चिंतन समाजशास्त्रीय रूप धारण करते. |

बाबासाहेब आंबेडकरांचे वृत्तपत्रीय लेखन समाजपरिवर्तनाच्या जाणिवेने मुसमुसलेले आहे. सामाजिक परिवर्तनाच्या ध्येयातून हे लेखन आकारास आले आहे. ही परिवर्तनशीलता समन्वयवादी अथवा तडजोडवादी नाही. बाबासाहेब विचाराविष्कार करताना कोठेही ढिलेपणाची अथवा धीमेपणाची भूमिका घेत नाहीत. त्यांची भूमिका ही नेहमीच समरांगणावरील लढवय्या योद्धचाची असते. संघर्ष हा त्यांच्या समग्र लेखनाचा गाभा आहे व निर्भयता हा त्यांचा स्वभाव आहे.

(सत्तावीस)