हिन्दी राजकारणाचा विचका हा - Page 308

२६६ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे:

असे उत्तर देऊन प्रश्‍नकर्त्याला त्यांनी गप्प बसविले. या उत्तराने कोणा स्वातंत्र्यवाद्यांची शांती होणार असेल त्याची होवो! पण या उत्तराने कोणीही फसून जाणे शक्य नाही, या उत्तराने जर कोणती गोष्ट सिद्ध होत असेल तर ती एकच की काँग्रेस या बाबतीत इंग्रज लोकांबरोबर लढा करण्यास सिद्ध नाही व लढ्याला जी सामग्री अवश्य असते तीही त्यांच्याजवळ नाही. ही गोष्ट इंग्रज सरकार पूर्णपणे जाणून आहे. ' पार्लमेंटमध्ये हिन्दुस्थानाविषयी जी परवाच प्रश्‍नोत्तरे झाली त्यात हिन्दुस्थानची राजकीय परिस्थिती क्षोभकारक व चिंताजनक नाही, असे स्टेट सेक्रेटरी मि. एमरी यांनी जे उत्तर दिले त्यावरून काँग्रेसचे इंग्रज सरकारला किती भय वाटते हे दिसून येते. काँग्रेसची मागणी म्हणजे कोल्ह्यांची कुई आहे, सिंहाची गर्जना नव्हे, हे इंग्रज सरकार पूर्णपणे जाणून आहे. ती जाणीव खोटी आहे, असे कोणाला म्हणता येणार नाही. अशा परिस्थितीत असाध्य गोष्टी मिळविण्याच्या भानगडीत न पडता जी गोष्ट साध्य आहे ती हस्तगत करून घेऊन राष्ट्राची शक्‍ती वाढविणे यातच खरे शहाणपण आहे, असे आम्हास वाटते. "अर्धा मुल्ला हा धर्माला विघ्न आहे अशी पर्शियन भाषेमध्ये एक म्हण आहे. अर्धवट राजकारणी पुरुष हा देखील राष्ट्राला विघ्न आहे, असे म्हणण्यास हरकत नाही. शहाणपणा जर शिकावयाचा असेल तर तो काही घुटक्या घुटक्याने शिकता येणार नाही, किंवा पाठापाठाने शिकता येणार नाही. जे वेडगळपणाचे असेल ते सर्व सोडून दिले पाहिजे व जे शहाणपणाचे असेल ते सर्व ग्रहण केले पाहिजे. अर्धवटपणा करून काही उपयोग नाही आणि म्हणून वर्किंग कमिटीने. सर्वपक्षीय मंत्रीमंडळास मान्यता देण्याचा ठराव करून जसा आपला शहाणपणा दाखविला तसा संपूर्ण स्वातंत्र्याच्या बाबतीत आपला आंग्रह सोडून प्राप्त होण्यासारखे जे वसाहतीचे स्वराज्य, त्याच्यावर तूर्त तहान भागवून या देशाच्या बाबतीत जो घोर प्रसंग उद्भवला आहे त्याचे निवारण करण्याकरिता सत्ता हस्तगत करण्याची ही जी अमोल संधी प्राप्त झाली आहे तिचा इन्कार करू नये, अशी आमची त्यांना सूचना आहे.

` अहिसेचा अतिरेक आणि देशाचे घिंडवडे

गेल्या अंकात काँग्रेस वर्किंग कमिटीने पसार केलेल्या युद्धविषयक ठरावासंबंधाने आमचे मत काय आहे ते आम्ही प्रसिद्ध केले आहे. या अंकात अहिंसेसंबंधीचा जो ठराव काँग्रेस वर्किंग कमिटीने पसार केला आहे त्या संबंधाने आमचे विचार मांडण्याचे आम्ही योजले आहे. अहिंसेसंबंधीचे आपले मत काँग्रेस वर्किंग