हिंदी राजकारणाचा विचका २७१
काढण्याकरिता त्यांना जर्मनीतून माणसे आणावी लागतील. एकतर लाजेमुळे ते स्वारी करणार नाहीत किंवा निर्लज्ज होऊन निःशस्त्र प्रजेवरती त्यांनी स्वारी केलीच तर असहकारितेच्या निर्धारामुळे त्यांना राज्य करणे अशक्य होईल व आले तसे त्यांना परत जावे लागेल. अशारीतीने निःशस्त्र प्रतिकाराच्या उपायाने राष्ट्राचे यशस्वी रीतीने परचक्रापासून रक्षण करता येईल. |
प्रोफेसर बर्ट्रण्ड रसेलच्या योजनेत व गांधींच्या योजनेत काहीच फरक नाही. फरक असलाच तर तो एवढाच की प्रो. रसेल यांनी ही योजना अंमलात आणण्यास एका पीढीची मुदत घातली होती. निःशस्त्र प्रतिकाराच्या तत्त्वाची शिकवण एका पिढीपर्यंत लोकांना दिल्यानंतर ती योजना अंमलात आणावी असा व्यवहारीपणाचा निर्बध त्यांनी आपल्या योजनेत घातला होता. गांधी एका पीढीचा काय पण एका घडीचासुद्धा अवसर देण्यास तयार नाहीत. या घडीस आपली निःशस्त्र प्रतिकाराची योजना यशस्वी रीतीने अंमलात आणता येईल, असा त्यांचा विशवास आहे. या भेदामुळे गांधींना आतताईपणाबद्दल व आत्यंतिक विचारसरणीबद्दल दोष देता येईल. तसेच जगात दुसरे अनेक देश असतांना हिंदुस्थानच्या लोकांनी जगाला धडा देण्याकरिता आपली आहुती का द्यावी, असा सवालही विचारता येईल ; पण ज्या योजनेला प्रो. बर्ट्रण्ड रसेलसारख्या व्यवहारी माणसाचा पाठिंबा आहे ती योजनाच मुळी खुळचट आहे, असे सहजासहजी कोणाला म्हणता यावयाचे नाही.
गांधींची निःशस्त्र प्रतिकाराची योजना मनुष्यमात्राच्या जीवनाला कितपत उपयुक्त आहे, याचा निर्णय करणे सोपे नाही. परंतु या साधनाने कोणता लाभ होतो व पाशवी शक्तीने कोणती हानी होते याचा तौलनिक [दृष्टीने ] [विचार ] [केला ] तर या योजनेबद्दल निर्णय देणे फारसे कठीण जाणार नाही.
निःशस्त्र प्रतिकाराच्या उपायाने कोणता लाभ होऊ शकतो, असा प्रश्न केला असता जे लोक निःशस्त्र प्रतिकाराच्या योजनेचा पुरस्कार करतात त्यांचेकडून असे सांगण्यात येते की निशस्त्र प्रतिकार ही निर्वैर मनोदशेची जननी आहे आणि निर्वेर मनोदशा ज्याचे ठायी बाणली त्यांना एकमेकाविरुद्ध पाशवी शक्तीचा तर नाहीच पण कोणत्याही शक्तीचा उपयोग करण्याचे कारण राहणार नाही.
ही विचारसरणी गांधींची विचारसरणी आहे आणि याच विचारसरणीचा याठिकाणी परामर्श घेणे विशेष जरूरीचे आहे. हरेकाने चित्तशुद्धी करून अहिंसेचे तत्त्व अंगी बाणविले तर त्याने सर्व कार्यभाग होईल. या विचारसरणीत मुख्यतः दोन दोष दिसून येतात. पहिला दोष असा को युद्धासारख्या प्रसंगी