हिन्दी राजकारणाचा विचका हा - Page 316

२७४ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

देशातील लोकांना कळून चुकले आहे व ते प्रामाणिकपणाला जागले तर असहकाराची मातब्बरी काय आहे, हे आज ते जगाला सांगू शकतील. नैतिक बल, अथवा नैतिक बल व त्यांच्याबरोबर असहकारता या जोडगोळीचा उपयोग होत आहे. हे सिद्ध झाल्यावर पाशवी शक्तीचा उपयोग कराच असा दुराग्रह कोणीही धरणार नाही. परंतु या मार्गाने जर प्रसंग टळला नाही तर काय ? तरी देखील पाशवी शक्तीचा आश्रय घेऊ नये काय ?

पाशवी शक्तीचे कायमचे उच्चाटण करणे हे जर अहिंसकांचे ध्येय आहे व ते ध्येय निःशस्त्र प्रतिकाराच्या उपायाने साध्य होत नसेल तर पाशवी शक्तीचा उपयोग करावा किंवा न करावा हा तिसरा प्रश्‍न उभा राहतो. हा प्रश्‍न दिसावयाला मागच्या प्रश्‍नासारखाच जरी असला तरी तो भिन्न आहे. मागचा प्रश्‍न पाशवी शक्तीची धाड आली असताना काय करावे या.संबंधीचा आहे, आताचा प्रश्‍न पाशवी शक्तीचे निर्मूलन कसे होईल यासंबंधीचा आहे. जेव्हा जेव्हा पाशवी शक्तीची धाड येईल तेव्हा तेव्हा निःशस्त्र प्रतिकाराच्या शस्त्राने त्याला तोंड द्यावयाचे, एवढाच जर अहिंसावाद्यांचा कार्यक्रम असेल तर निःशस्त्र-प्रतिकार हा एक मोठा उपद्रवच आहे, असे म्हणावे लागेल. अशा या निःशस्त्र-प्रतिकाराच्या पद्धतीने जग पाशवी शक्तीच्या भोवऱ्यातून कधीही बाहेर पडू शकणार नाही. एका पीढीने निःशस्त्र-प्रतिकार करून मिळविलेला लाभ दुसऱ्या पीढीला मिळू शकला नाही तर पाशवी शक्तीच्या भोवऱ्यातून कोणी बाहेर पडू शकणार नाही व अहिंसेच्या तत्त्वाचा विजय झाला असे केव्हाच म्हणता येणार नाही. पाशवी शक्तीचा योग कायमचाच बंद झाला नाही तर प्रसंगोपात्त निःशस्त्र-प्रतिकार हा एक पोरखेळच होऊन बसेल. पाशवी शक्तीचे निर्मूलन करणे हे ध्येय साध्य होत नसेल तर पाशवी शक्तीचा उपयोग कां करू नये, हा महत्त्वाचा प्रश्‍न आहे. आता असे म्हणता येईल की एकदा पाशवी शक्तीचा उपयोग केल्याने पुन्हा पाशवी शक्‍ती आपले डोके वर काढणार नाही, अशी तरी हमी कोण देऊ शकेल ? याला उत्तर असे की ज्या बाजूच्या पाशवी शक्तीचा जय होइल त्या बाजूने आपल्याला प्राप्त झालेल्या विजयाचा स्वार्थाकरिता उपयोग न करता नवीन जागतिक घटना तयार करण्यासाठी केला तर पाशवी शक्तीचा पाशवी शक्तीने नायनाट करणे शक्य आहे. प्रश्‍न असा की अशा कामी पाशवी शक्तीचा उपयोग करणे रास्त आहे किंवा नाही ? वरील विवेचनावरून खालील सिद्धांत ठरविता येतील :

पहिला सिद्धांत असा की पाशवी शक्तीचा कधीही उपयोग करण्यात येऊ नये हे म्हणणे अविचारोपणाचे आहे, नव्हे, आम्हाला तर असे वाटते की 'कोणत्याच