जीबन अस्पृश्यांच्या माथी मारण्यात आले होते. गावबंदी, रोटीबंदी, बेटीबंदी या श्रृंखलांनी त्यांचे जीवन कायमचे बंदिस्त झाले होते. अशा या ग्लानीग्रस्त समाजात बाबासाहेब आंबेडकरांनी क्रांतीचे स्फुल्लिंग प्रज्वलीत केले. आकाशातील काळ्याकभिन्न अंधाराला चिरीत विजेचा कल्लोळ उठावा आणि संपूर्ण आकाश नखशिखान्त प्रकाशमान व्हावे, त्याप्रमाणे बाबासाहेबांचे दलित वर्गाच्या जीवनात आगमन झाले. बाबासाहेबांचे हे आगमन समस्त दीनदलितांच्या बंधमुक्तीचे प्रतीक ठरले. बाबासाहेबांनी आपल्या पत्रकारितेच्या व त्यातील वैचारिक लेखनाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासात पहिल्याप्रथम स्वातंत्र्यसूत्रांचे प्रभावी प्रगटीकरण केले. त्यामुळेच त्यांची पत्रकारिता युगप्रवर्तक पत्रकारिता ठरते.
बाबासाहेबांनी आपल्या वृत्तपत्रीय लेखनातून घडवून आणलेली विचारक्रांती सर्वंकष स्वरूपाची आहे. बाबासाहेबांच्या वैचारिक निबंधाने महाराष्ट्रात अभूतपूर्व विचारमंथन केले. हिंदू समाजव्यवस्था व त्याच्याशी संबंधित असणारे धर्मकारण, राजकारण, अर्थकारण या सर्व घटकांची त्यांनी सखोल चर्चा-चिकित्सा केली. बाबासाहेब आंबेडकर हे असे समाजशास्त्रज्ञ व धर्मशास्त्रज्ञ होते तसेच ते राज्यशास्त्रज्ञ व अर्थशास्त्रज्ञ होते याची साक्ष त्यांच्या या मूलगामी चर्चा-चिकित्सेमधून अभिव्यक्त होते. बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्वातील संशोधकाचे हे सर्व पैलू त्यांच्या लेखनातून विशेषत्वाने प्रगट होतात. त्यांची वैचारिक जडणघडण ही मानव्यविद्याशास्त्रज्ञांची आहे. बाबासाहेबांची संशोधकीय वृत्ती केवळ तथ्यांना व निष्कर्षांना मांडून थांबत नाही. या नवसिद्धांतांची सांगड ते समाजविकासाच्या प्रक्रियेशी घालतात. बाबासाहेबांचे संपूर्ण समाज-चिंतन व विचार-मंथन हे समाजविकासाच्या संकल्पनेशी प्रतिबद्ध आहे. त्यांचा प्रत्येक विचार सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून आकारास आलेला. आहे. बाबासाहेबांचे मन स्त्री-शूद्रातिशाद्रांच्या समूहमनाशी घट्ट बांधलेले आहे. म्हणूनच ते वैयक्तिक विकासापेक्षा समाजाच्या विकासास श्रेष्ठ स्थान देतात. ” वैयक्तिक कर्तबगारी ही आदरणीय असते, पण पुष्कळवेळा ती अनुकरणीय नसते व म्हणूनच वैयक्तिक कर्तबगारी व सामुदायिक कर्तबगारी यांच्यात तुलना करता सामुदायिक कर्तबगारी शेकडो पटींनी श्रेयस्कर ठरते. वैयक्तिक कर्तबगारी आकाशाएवढी उंच असली तरी साधारण उंचीच्या सामुदायिक कर्तबगारीच्या पासंगालाही ती पुरणार नाही.“ बाबासाहेबांचे हे विचार त्यांच्या उत्कट समाजनिष्ठेचे द्योतक आहेत. त्यांची ही उत्कट संमाजनिष्ठा दलितवर्गाबरोबर स्त्री-शूद्रांचे जीवन प्रकाशमय करते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी वृत्तपत्रीय निबंधलेखनातून महाराष्ट्रीय समाजाचे प्रबोधन निष्ठापूर्वक केले. नवविचारांच्याच साहाय्याने समाजाचा उत्कर्ष होऊ शकतो, यावर त्यांचा पूर्ण विश्वास होता. हजारो वर्षापासून ज्ञानवंचित व
(एकोणतीस)