हिन्दी राजकारणाचा विचका हा - Page 344

डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे 302

स्वीकार करू शकली नाही. कमिटीला वाटले की प्रतिस्पर्धाच्या संकटाचा फायदा घेणे ही तिरस्करणीय गोष्ट वाटावी इतके मानसिक सामर्थ्य प्राप्त होण्याला जरूर असलेली अहिंसावृत्ती राष्ट्रामध्ये अजून बिंबलेली नाही. पण कमिटीने घेतलेल्या या निर्णयाची कारणे नमूद करताना इंग्रजांबद्दल जास्तीत जास्त

कळकळ प्रदर्शित करण्याची कमिटीची इच्छा दिसली."

'"यावेळी क्षुल्लक भांडणात आणि पक्षांतर्गत झगडे करण्यात काँग्रेसचे अनुयायी गुंतून राहणार असतील तर ती खेदाची गोष्ट आहे. कमिटीने घेतलेल्या निर्णयातून जर काही महत्त्वाचा आणि यथायोग्य परिणाम निष्पन्न होणार असेल तर एकूण एक कॉँग्रेसच्या अनुयायांनी कमिटीवर अविभक्त आणि असंदिग्ध निष्ठा ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. त्याचप्रमाणे ब्रिटीश सरकारने आपले धोरण स्पष्टपणे जाहीर करावे आणि त्याला अनुसरून चालू युद्ध परिस्थितीत शक्य असलेली अशी काहीतरी कृती करून दाखवावी, अशी जी मागणी कमिटीने केली आहे तिला इतर सर्व राजकीय पक्ष आणि सर्व जाती संयुक्तरीतीने पाठिंबा देतील अशीही मी आशा करतो."

'' आज जर कशाची जरूर असेल तर ती ब्रिटिश मुत्सद्यांची मानसिक क्रांती होण्याची आहे. अधिक स्पष्टपणे बोलावयाचे तर लढाईच्या प्रारंभी केलेली आणि अजूनही ब्रिटिश व्यासपीठावरून पुनःपुन्हा केली जाणारी लोकशाहीवर असलेल्या विश्‍वासाची जाहीर घोषणा प्रामाणिक कृतीच्या द्वारे अंमलात आणणे एवढ्याच गोष्टीची आज जरूरी आहे. ग्रेट ब्रिटन हिंदुस्थानला त्याच्या इच्छेविरुद्ध युद्धक्षेत्रात ओढणार की खऱ्या लोकशाहीच्या संरक्षणाच्या कामी स्वखुशीने सहकार्य करणारा मित्र म्हणून जवळ करणार ?"'

पहिले मत बिनशर्त मदत, दुसरे मत सशर्त मदत. दुसरे मत प्रतिपादिल्यानंतर, तिसरे मत म्हणजे मुळीच मदत न करणे ! आणि ते का तर मदत केल्याने अहिंसेच्या तत्त्वाला बाध येतो म्हणून ! गांधींचे पहिले मत आमच्या मताप्रमाणेच होते व तेच याप्रसंगी योग्य आहे, असे आमचे म्हणणे आहे. दुसरे मत पहिल्या मतापेक्षा जरी भिन्न असले तरी ते व्यवहारास धरून होते, हे आम्हास मान्य आहे. परंतु त्यांचे तिसरे मत हे अगदीच वेडगळपणाचे आहे. हिंसावादी खिलाफतवाल्यांना अहिंसावादी गांधी मदत करावयास तयार होतात तर इंग्रजांच्या बाबतीतच त्यांना अहिंसा आड का यावी, याचे कोणासही आश्‍चर्य वाटल्यावाचून राहणार नाही. नन कर्त्याचा वार शनिवार' म्हणून अहिंसेचे खुळ त्यांनी पुढे केले असावे किंवा बेजबाबदार विचारांच्या प्रवाहात गटांगळ्या खात ते पडले असावेत, याशिवाय तिसरे काही आमच्या मते तरी संभवत नाही.