हिन्दी राजकारणाचा विचका हा - Page 346

३०४ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

क्षणाच्या विधानांचा मेळ बसतो आहे एवढेच मी पाहात असतो. याचा परिपाक असा झाला आहे की मी माझे आयुष्य सत्याकडून सत्याकडे जाण्यास (शाश्वत सत्याच्या मार्गावर) व्यतीत करीत आहे. या योगै माझ्या स्मरण शक्तीवर पडणारा अनावश्यक ताण मी टाळला आहे आणि विशेष सांगावयाचे म्हणजे असे की जेव्हा जेव्हा पन्नास वर्षापूर्वी मी लिहिलेल्या लिखाणाशी माझे अगदी ताजे लिखाण ताडून पाहणे मला भाग पडले तेव्हा तेव्हा त्या दोहोमध्ये मला यत्किंचितही विसंगती आढळून आली नाही. तथापि ज्या माझ्या मित्रांना अशी. विसंगती आढळेल त्यांनी (अर्थातच ज्यांना पूर्वीच्या लिखाणातील अर्थ अधिक पसंत असेल त्यांनी तो अर्थ घ्यावा) माझ्या अगदी अलिकडील लिखाणातील अर्थ ग्राह्म धरणेच अधिक उचित होईल. परंतु अशा प्रकारची निवड करण्यापूर्वी वरवर दिसणाऱ्या दोन विसंगतीत मूलभूत आणि सातत्यक्षम अशी सुसंगती आढळते की नाही हे शोधण्याचा त्यांनी प्रथम प्रयत्न करुन पाहावा."

पुढारी पाहिजे असतो तो दिशा दाखविण्याकरता-सत्य शोधण्याकरता नव्हे! पण गांधींनी याचा विचार का करावा ? गांधींना जाब विचारणारा कोणी असता तर असले महात्मेगिरीचे म्हणजेच फाजीलपणाचे उत्तर गांधींना देणे शक्य झाले नसते. जाब विचारणारा नाही ' म्हणून तर गांधींचा हा राजकारणातला स्वेच्छाचार सुखाने चालला आहे. अशी भाषा युरोपातील कोणा पुढाऱ्याने जर काढली असती तर त्याला पुढारीपणावरून खेचून काढण्यास तेथील लोकांस पाच मिनिटेही लागली नसती. लोक पडले भोळे आणि अधिकारी झाला उन्मत्त' अशी या देशातली स्थिती आहे. महात्म्याने काहीही केले तरी तो महात्माच अशी लोकांची भावना आहे. अधिकार आहे तेव्हा आपण वाटेल ते म्हटले तरी लोक कबूल करतील हा गांधींचा मद । जेथे लोक भोळे आहेत व अधिकारी पुरुषावरती त्यांचा पूर्ण विश्वास आहे तेथे अधिकारी पुरुषाची जबाबदारी फारच मोठी आहे. त्याने लहरीप्रमाणे मतपालट करणे म्हणजे लोकांना भांबावून टाकण्यासारखेच आहे. गांधींनी घेतलेली ही नवी भूमिका म्हणजें उपदेश नसून उपदंश (उपद्रव?) आहे. असे आम्हास वाटते व त्यापासून लोकांनी सावध राहावे, अशी आमची त्यांना सूचना आहे.

गांधींच्या उपदेशापासूनही सावध राहा तसेच काँग्रेस वर्किंग कमिटीच्यापासूनही सावध राहा, असे सांगणे आम्हास अवश्य वाटते. अटीतटीच्या करारमदारापासून काही निष्पन्न होणार नाही. अडवणूक करू अशी किती जरी इच्छा असली तरी इंग्रजांची अडवणूक होऊ शकत नाही. काँग्रेस काही रिक्रुट भरतीला बंदी करू शकत नाही, काँग्रेसने करू म्हटले तर इतर पक्ष सहाय्य करण्यास तयार