क्रांतीची उपासना कां ध्येयाचे रक्षण - Page 350

30¢ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

रशियन क्रांतीचे महत्व जर कोणत्या एका गोष्टींत सांठविलेले असेल, तर ते आर्थिक स्वातंत्र्य व समानता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केल्यामुळेच होय. हा कार्यक्रम कांही लहानसहान नव्हें. आर्थिक समानतेशिवाय सामाजिक समता व सामाजिक स्वातंत्र्य ही दोन्ही फोल आहेत, हे फ्रेंच क्रांतीचा इतिहास जो कोणी परिशिलन करून पाहील त्याला कळून चुकेल. ज्याला धन नाही त्याला मान नाही. ज्याला धन नाही त्याला स्वातंत्र्य नाही, कारण त्याला पोटाकरितां दुसऱ्यावर अवलंबून राहिल्याशिवाय मार्ग नाही. जो परावलंबी आहे तो मनुष्य केव्हांही स्वतंत्र असू शकत नाही. रशियन क्रांतीकारकांचे मार्ग सदोष अघोरी आहेत अशी तक्रार करता येईल. समता प्रस्थापित करण्याकरितां रशियाने व्यक्तीस्वातंत्र्य नष्ट केले. असे करणे समाजाच्या धारणेच्या दृष्टीने योग्य आहे काय अशी विरोधी वृत्ती घेता येईल परंतु कांही म्हटले तरी जेथे आर्थिक असमानता अपरिमित प्रमाणांत नांदत आहे तेथे खरे स्वातंत्र्य नाही ही गोष्ट सर्वांस कबूल करावीच लागेल. अशा पद्धतीने पहाता रशियन क्रांतीचा कसा अन्योन्य संबंध आहे व फ्रेंच क्रांतीपेक्षा रशियन क्रांतीचे महत्त्व जास्त कां हे दिसून येईल. फ्रेंच क्रांती ही पोळी आहे. रशियन क्रांती ही पोळीतले पुरण आहे. फ्रेंच क्रांती ही कळी आहे व रशियन क्रांती हे विकास पावलेले फूल आहे. मनुष्यमात्राच्या इतिहासांत त्यांचे उदंड महत्व असल्याकारणाने रशियन क्रांतीचा दिन फ्रेंच क्रांतीच्या दिनापेक्षा जास्त प्रमाणात साजरा करण्यात यावा, हे सहाजिक आहे.

वर सांगितल्याप्रमाणे रशियन क्रांतीचे उपासक हिंदूस्थानमध्ये अनेक आहेत. या उपासकामध्ये बरेचसे किरकोळ, ढोंगी, पोटभरू असे लोक आहेत; परंतु त्या बरोबरच या देशातील राजकारणामध्ये अग्रभागी असलेले कांही लोक आहेत, हेहि तितकेच खरे आहे. पं. जवाहरलाल नेहरू, जयप्रकाश नारायण वगैरे राजकारणात पुढारी असलेले लोक या रशियन क्रांतीचे उपासक आहेत. परंतु या रशियन क्रांतीच्या हिंदुस्थानातील उपासकांना आमचा असा सवाल आहे की, तुम्ही फक्त हा दिवस साजरा करणार व स्वस्थ बसणार, कां या रशियन क्रांतीने ज्या तत्त्वांना जन्म दिला त्या तत्त्वांच्या संरक्षणार्थ तुम्ही प्रयत्न करणार ? आज जे जागतिक युद्ध चालू झाले आहे त्या युद्धात तत्त्वाचा लढा आहे, हे कोणीही नाकबूल करू शकणार नाही. एका बाजूला झोटिंगशाही व दुसऱ्या बाजूला लोकशाही असे पक्ष पडलेले आहेत. या लढ्यात रशियन क्रांतीच्या उपासकांना लोकशाहीच्या बाजूने लढून लोकशाहीचा विजय करणे हे त्यांचे कर्तव्य कर्म आहे, असे आम्हास वाटते. परंतु आश्चर्याची गोष्ट ही की, जे लोक रशियन क्रांतीचे

tore, परिशिष्ट क्रमांक : १८.