क्रांतीची उपासना कां ध्येयाचे रक्षण - Page 351

क्रांतीची उपासना कां ध्येयाचे रक्षण _ ३०९

उपासक म्हणून अभिमान बाळगतात तेच लोक ह्या लढाईमध्ये ब्रिटिश सरकार लोकशाहीच्या वतीने लढत आहे, हे मान्य असूनही मदत करण्यास तयार नाहीत. नव्हे. मदत करू नये म्हणून प्रचार करण्याचा त्यांनी चंग बांधला आहे. ही वागणूक कशी विचित्र व कशी विसंगत आहे हे उघड आहे. रशियन क्रांतीचे उपासक म्हणवून घेत असताना स्वातंत्र्याचे व समतेच्या तत्त्वांचे रक्षण करण्याकरिता या उपासकांनी पुढे येऊ नये, याला काय उत्तर असावे: याचा पुष्कळाना अचंबा वाटल्याशिवाय रहाणार नाही. याला विसंगतपणाचे जे उत्तर देण्यात येते ते असे आहे.--खुद्द रशिया ज्याने समतेकरिता व स्वातंत्र्याकरिता जगामध्ये अघोर साधनांचा उपयोग करून व अघोरीपणाच्या दूषणांस न जुमानता क्रांती केली तोच रशिया आजच्या युद्धात लोकशाहीच्या वतीने लढण्यासं जर सिद्ध नाही तर आम्ही या लढ्यात कां भाग घ्यावा ? गुरू वागेल तसेच शिष्यांनी वागावे या शिष्टाचाराप्रमाणेच वागणे, हेच जर ध्येय असेल, तर ही विचारसरणी तर्कशुद्ध आहे हे मान्य करावे लागेल. या युद्धात रशियाची वर्तणूक दुर्बोध आहे हे सर्वानाच दिसण्यासारखे आहे. हे लढाईच्या सुरुवातीसच ज्या साम्राज्यशाही जर्मनीविरूद्ध रशियाने आज वीस वर्षेपावेतो धर्मयुद्ध चालविले होते त्याच साम्राज्यशाहीबरोबर तहनामा करून त्याने पोलंडवरती अतिक्रमण करून त्याचा विच्छेद केला व त्याचे स्वातंत्र्य हरण करून त्या देशाचा अर्धा भाग आपल्यात सामील केला. पोलंडचे स्वातंत्र्यहरण केल्यानंतर रशियाने फिनलंडवर स्वारी केली व ५/६ महिन्याच्या लढाईनंतर फिनलंडचेही स्वातंत्र्य नष्ट केले. फिनलंडचे स्वातंत्र्य नष्ट केल्यानंतर रशियाने एस्थोनिया, लॅटव्हिया अशा बाल्टिक समुद्राच्या किनाऱ्यावरती वास्तव्य करून रहात असलेल्या स्वतंत्र राष्ट्रावरती घाला घालून त्यांचेही स्वातंत्र्य हरण केले. त्यानंतर काळयासमुद्रावरतीं आपले वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या हेतूने रशियाने त्या भागाकडे आपली दृष्टी फिरविली व रुमानियाचा डव्ऱ्यूज या नांवाचा जो प्रांत होता, तो नुसत्या दमदाटीने गिळंकृत करून टाकिला. रशियाचा या मुलुखगिरीमुळे हिटलरला मोठाच फायदा झाला हे उघड आहे. जर्मनीची पूर्व बाजूची सरहद्द निर्वैर झाल्यामुळे जर्मनीला आपले सर्व सैन्य व आपली सर्व युद्धाची सामुग्री एकवट करून जर्मनीच्या पश्‍चिम सरहद्दीवरील राष्ट्रांवर मारा करण्याचे काम साधे व सुलभ होऊन गेले. फ्रान्स, बेलजियम, नॉर्वे, हॉलंड या देशांना जर्मनी या युद्धांत पायाखाली तुडवूं शकला याची जबाबदारी पर्यायाने रशियावरतीच पडते, असे निदान आम्हांस तरी वाटते. . रशियाने जर्मनीच्या पूर्व दिशेवरती ही पुंडाई चालविली नसती आणि जर्मनीच्या हुकुमशाहीस आळा