“ कामगारशाहीचा विजय असो - Page 356

३१४ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

जगातील लोकशाही राष्ट्रांनी आपले भांडवलशाही धोरण सोडावयास हवे व रशियानेही आपले सोटेशाही धोरण टाकून द्यावयास हवे. असे झाले तर समाजसत्तावादी रशिया व लोकशाही राष्ट्रे यांच्या संगनमताने जगात नव्या युगाला सुरुवात होईल असे वाटते.

जागतिक कल्याणासाठी वर दर्शविल्याप्रमाणे रशिया व जगातील इतर लोकशाही राष्ट्रे यांचे सहकार्य घडून यावयास हवे आहे. पण आजतरी असा सुयोग येण्याचा संभव दिसत नाही. चालू लोकशाही विरूद्ध हिटलरशाही यामध्ये जे महायुद्ध चालू आहे त्यात रशियाच्या स्टॅलिनशाहीचे जर्मनीच्या हिटलरशाहीशी चांगलेच मेतकूट जमले आहे. या परिस्थितीत लोकशाही राष्ट्रांना एकाकीच हिटलरशाहीला तोंड देणे प्राप्त झालेले आहे. भावी कामगारशाहीच्या दृष्टीने पहाता आजचा प्रसंग आणिबाणीचा आहे. हिटलरशाही विजयी होऊन भावी जगात 'बळी तो कानपिळी' हा न्याय सर्रास जारी होणार कां? लोकशाही यशस्वी होऊन जगात नव्या जगाची, नव्या जोमाने "स्वतंत्रता, समता व बंधुता' या त्रिकालबाधीत तत्त्वावर पुनर्घटना होणार, हा प्रश्न चालू युद्धाने सुटावयाचा आहे. अशा या प्रसंगी सर्व लोकशाही व कामगारशाहीवादी मुत्सद्यांनी चालू युद्धात लोकशाही राष्ट्रानांच शारीरिक, मानसिक व आर्थिक अशी शक्य तितकी मदत करून 'बळी तो कानपिळी' या हिटलरशाही पिशाच्याला खोल गाडून टाकणे हेच त्यांचे खरे कर्तव्य होणार नाही काय ?” १

१ : स्फुट, जनता, दिनांक ९ नोव्हेंबर १९४०. उद्धृत, खैरमोडे, खंड ९ वा, पृ. ५०-५१.