९३
बरे झाले, महात्मा गेला, माणूस राहिला
“मी दरेक इंग्लिश माणसास अशी विनंती करतो की त्यांनी हिंसेच्या ऐवजी अहिंसेचा मार्ग स्वीकारावा आणि अहिंसेच्या मार्गानेच जे काही तंटेबखेडे उपस्थित झाले आहेत ते सोडविण्याचा प्रयत्न करावा. आतापर्यंत तुम्हाला हा उपदेश करण्याचे धैर्य मला नव्हते. परमेश्वर कृपेने हे धैर्य आज मला प्राप्त झाले आहे. म्हणून मी तुम्हाला हा उपदेश करीत आहे. ही लढाई बंद करा, असे मी आपणास सांगू इच्छितो. तुम्ही लढाई करण्यास सामर्थ्यवान नाहीत म्हणून हे मी तुम्हाला सांगतो असे नव्हे तर हिंसा ती अत्यंत वाईट गोष्ट आहे म्हणून मी सांगत आहे. कोणतेही कार्य कितीही पवित्र असले तरी त्याच्याकरिता असंख्य लोकांचा संहार करणे रास्त होणार नाही इतकेच नव्हे तर ज्या कार्याच्या पूर्ततेकरिता एवढा संहार करावा लागतो ते कार्य पवित्र आहे किंवा काय याबद्दल मला मोठा संशय वाटतो. तुम्हाला जर्मनांच्याविरूद्ध लढावयाचे आहे, ते मला मान्य आहे. त्यात इंग्रजांना अपयश यावे, अशी माझी मुळीच इच्छा नाही. मला तुम्हाला एवढेच सांगावयाचे आहे की नाझीविरूद्ध लढा पण अहिंसात्मक साधनांनी लढा. तरवारी, बंदुका, दारूगोळा वगैरे हिंसात्मक साधनांचा उपयोग करू नका. माझी अशी इच्छा आहे की तुम्ही इंग्रज लोकांनी हिटलर व मुसोलिनी यांना ' तुम्हाला आमच्यापासून काय पाहिजे असेल ते या आणि घ्या ' असे आमंत्रण पाठवावे. त्यांना येऊ द्या व तुमच्या देशात जे काही त्यांना लागेल व आवडेल ते घेऊ द्या. हिटलर व मुसोलिनी यांना जर तुमची घरेदारे घ्यावयाची असतील तर ती खाली करून तुम्ही त्यांच्या स्वाधीन करा. ते जर तुम्हाला घर सोडून बाहेर जाण्याला परवानगी देत नसतील तर तुम्ही तुमच्या पुरुष, बायका व मुलांचा खून होऊ द्या. पण हिंसात्मक प्रतिकार करू नका, मी जो हा अहिसेचा उपदेश तुम्हास करीत आहे तो मी अडाणी मनुष्य आहे म्हणून असे तुम्ही समजू नका. अहिंसेच्या साधनाचा मी आज. पन्नास वर्षे सारखा अनुभव घेतलेला आहे. माझ्या आयुष्यातील दरेक प्रकारच्या व्यवहारात घरगुती, सार्वजनिक, आर्थिक व राजकीय प्रसंगी मी या मार्गाचा अवलंब केला आहे व मला त्यात कधीही अपयश आलेले नाही. “ (गांधी)